नागपूर : राष्ट्रीय ऐक्यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. परंतु गेल्या तीन वर्षांत देशातील लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात ‘हम हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे’ असा विश्वास व्यक्त केला होता. त्याच नागपुरात ‘हम लढेंगे, और जितेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत भाजपा सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा झाला. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री वसंत पुरके आदी उपस्थित होते.राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे भाजपा हादरला आहे. गुजरात निवडणुकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल. या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याचे त्यांनी सांगितले.देशात परिवर्तनाचे वारे सुरू झाले आहेत. नांदेड, भिवंडी, मालेगाव, गुरुदासपूर व चित्रकूट येथीलनिकाल याचे द्योतक आहेत. व्यापारीही आता ‘कमल का फूल एकही भूल’ असे म्हणत आहेत. इंदिराजींना कठीण काळात विदर्भाने साथ दिली होती.भविष्यात राहुल गांधी यांच्या माध्यमातून देशाला नवीन नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्याही पाठीमागे विदर्भ खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.>‘लोकमत’चे मानले आभारइंदिरा गांधी एकविसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. या पोलादी महिलेच्या जन्मशताब्दी निमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्यावर विशेषांक काढला. या माध्यमातून नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. या उपक्रमाचे कौतुक करून अशोक चव्हाण यांनी भाषणातून ‘लोकमत’चे जाहीर आभार व्यक्त केले.>नागपूर येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर माजी पंतप्रधान इंदीरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात मार्गदर्शन करताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, उपस्थितात स्वातंत्र्य सेनानी लिलाताई चितळे, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार व मान्यवर.
भाजपाला सत्तेतून खाली खेचा - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 5:16 AM