लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले. त्याबाबत देशभरात बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु असा हल्ला होणार असल्याची माहिती सरकारला आधीच होती. तेव्हा सरकारने यासंदर्भात कॅबिनेटची बैठक बोलावली का, डिफेन्सची बैठक घेतली का, घेतली असेल तर कुठल्या उपाययोजना केल्या, हल्ला झाला म्हणजे या माहितीकडेच दुर्लक्ष केले का, असे प्रश्न निर्माण होतात. याबाबतचा खुलासा आरएसएसचे चीफ (सरसंघचालक) मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत दिले.आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचे उत्तर देणार नाहीत. नितीन गडकरी हे पंतप्रधानानंतर भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. तसेच त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनही पाहिले जात आहे, त्यामुळे आम्ही त्यांना हा प्रश्न विचारत आहोत. आंबेडकर यांनी पत्रकारांना एक नोट सादर करीत ती वाचून दाखवली. तीत नोट अतिशय अर्जंट असल्याचे लिहिले होते. तसेच काश्मीरमध्ये हल्ला होणार असल्याचे सांगत सैनिकांची ये-जा असते त्याबाबत सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. ही नोट सुरक्षा दलातील सर्व प्रमुखांना आणि सरकारकडेही आली होती, असा दावा त्यांनी केला. पत्रपरिषदेला ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, सागर डबरासे, एमआयएमचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
भाजप-सेना आणि वंचित बहुजन आघाडीत लढतमहाराष्ट्रात भाजप-सेना युती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातच थेट लढत आहे. काँग्रेस कुठेही नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला. काँग्रेसचे सध्या आरएसएसकरण होत असून नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे डमी उमेदवार असल्याची टीका त्यांनी केली.
सोलापूरमुळे १४ जागी आम्ही चांगल्या स्थितीतधनगर समाजाने सर्वप्रथम राजकीय उठाव केला, तो सोलापूर येथून. वंचित बहुजन आघाडीची मुहूर्तमेढ तेथेच रोवल्या गेली. त्यामुळे मला तेथूनच निवडणूक लढवायची होती. सोलापूर येथून निवडणूक लढवित असल्याने आम्ही १४ ठिकाणी चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.