घरची परिस्थिती हलाखीची होती. शिक्षणासाठी नागपुरात आलो. तेव्हा खूप मोठे स्वप्न नव्हते. परिस्थितीनुसार सर्व काही करावे लागत होते. आईवडिलांना तर मुलगा काय करीत आहे हे देखील माहीत नव्हते. त्यांच्या खूप अपेक्षा नव्हत्या. पण डोळ्यासमोर एक ध्येय होते. दहावीला ५३ टक्के गुण मिळाले. १२ वी कॉमर्समध्ये ६३ टक्के गुण मिळाले. पण निराश झालो नाही. पुढे शिकत राहिलो. मार्ग शोधत राहिलो. १० वी ते १२ वी पर्यंत बोले पेट्रोल पंपावर प्रत्यक्ष पेट्रोल भरण्याचे काम केले. रात्रभर लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचो. सकाळी १० वाजता सुटी झाली की तेथेच नळावर आंघोळ. १० बाय ५ च्या खोलीच स्टोव्हवर चार भाकरी करायचो. दोन भाकरी सकाळी व दोन भाकरी रात्री. जेवण केले की मेडिकल चौकात नवयुग विद्यालयात पायी जायचो व पायी यायचो. बी.कॉम.ला असताना गांधीबागला ट्रान्सपोर्टमध्ये १० महिने नोकरी करायचो. दोन महिने परीक्षेसाठी सुट्या घ्यायचो. जीवनात संघर्ष होता. पण एक दिवस यश मिळेल याची आशा होती. पुढे बी.कॉम., एम.कॉम. केले. कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. बायोफोकल, नंतर ज्युनियर कॉलेज, नंतर सिनियर कॉलेज, नंतर प्राचार्य असा प्रवास झाला. आयुष्य सुकर होत गेले. आज स्वत:ची शिक्षण संस्था आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश केला. तेथेही एक उंची मिळाली. नाव झाले. आज मात्र सर्वत्र वेगळेच चित्र पहायला मिळते. पालकांनी स्वत:च्या अपेक्षा वाढवून घेतल्या आहेत. ते आपल्या अपेक्षा मुलांवर लादतात. तसे झाले नाही तर पालक व मुले दोन्ही निराश होतात. दोघांच्याही मनावर परिणाम होतो. दहावी, बारावीत मिळणारे गुण सर्वस्व नाहीत. जगात इंजिनिअर व मेडिकल हेच अंतिम लक्ष्य नाही. वेगवेगळे पर्याय आहेत. एक गाडी सुटली तर दुसरी पकडा. त्यात आपले जीवन घडवा. निराश होऊन जीवनाचा मार्गच बंद करणे योग्य नाही. उठा, बाहेर पडा. जग तुमची वाट पाहत आहे. कदाचित उद्या दुसऱ्याच एखाद्या क्षेत्रात तुम्ही मोठ्या उंचीवर गेलेले असाल. - डॉ. बबनराव तायवाडे, प्राचार्य, धनवटे नॅशनल कॉलेज प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती
पंपावर पेट्रोल भरले, आज स्वत:ची शिक्षण संस्था
By admin | Published: June 01, 2017 2:29 AM