अनेक दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त :भर पावसाळ्यात दारूचे पाट उमरेड (नागपूर) : मालवणीत (मुंबई) विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेल्याचे वृत्त कळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी उमरेड तालुक्यातील चांपा येथील पारधी बेड्यावर शुक्रवारी सकाळी धडक दिली. पोलिसांनी येथील अनेक दारूच्या भट्ट्या आणि शेकडो लिटर दारूही नष्ट केली. या कारवाईमुळे पारधी बेड्यासोबतच आजूबाजूच्या परिसरातही प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. चांपा पारधी बेड्यावरील बहुतांश मंडळी प्रामुख्याने गावठी दारूचा अवैध व्यवसाय करतात. मोहाचा सडवा घालून, शेकडो लिटर दारू गाळली जाते. ही दारू नागपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोहचवली जाते. दरम्यान, अनेक जणांचे बळी घेणारे मालवणीतील विषारी दारूकांडाने राज्यभर खळबळ उडवून दिल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त अधीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी , उपविभागीय पोलीस अधिकारी शंकरसिंग राजपूत , तहसीलदार चंद्रभान खंडाईत तसेच उमरेड, कुही, भिवापूर येथील मोठा पोलीस ताफा शुक्रवारी सकाळी १० वाजता पारधी बेड्यावर धडकला. त्यांनी घटनास्थळावरून ड्रम आणि डबक्यात साठवलेली शेकडो लिटर दारू तसेच सडवा नष्ट केला. पोलिसांची धाड पडताच दारू गाळणारे पळून गेले. तर, उपस्थित महिलांनी आक्रोश करून कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्या महिलांना दाद दिली नाही. (तालुका प्रतिनिधी)—
चांप्यात दारूचा पूर
By admin | Published: June 20, 2015 2:46 AM