लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या अवयवदान चळवळीसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. नागपुरात मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणासोबतच हृदय प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. पुण्यातील एका ३२ वर्षीय अवयवदात्याचे हृदय विशेष विमानातून नागपुरात आणून न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय युवकावर त्याचे यशस्वी प्रत्यारोपण केले. मध्यभारतात हे पहिल्यांदाच झाले. पुणे, मुंबई, औरंगाबादनंतर आता नागपूरही हृदय प्रत्यारोपणाचे केंद्र ठरले.गणेश चव्हाण (३२) रा. पुरंदर तालुका नीरा गाव, पुणे असे त्या अवयवदात्याचे नाव. गणेशला ३० मे रोजी ‘ब्रेन स्ट्रोक’ होताच पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते, परंतु शरीर प्रतिसाद देत नव्हते. अखेर ६ जून रोजी ‘ब्रेन डेड’ झाल्याची माहिती डॉक्टरांनी गणेशच्या नातेवाईकांना दिली. त्या दु:खातही कुटुंबीयांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. गणेशच्या वाढदिवसाच्या दिवशीच, म्हणजे ७ जून रोजी अवयव काढण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. हृदय, यकृत व दोन्ही मूत्रपिंडाचे दान करण्यात आले. अवयव प्रत्यारोपण ‘रोटो’चा नियमानुसार नागपूरच्या ‘झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमेटी’ला (झेडटीसीसी) याची माहिती देण्यात आली. नागपूर झेडटीसीसीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, डॉ. पी.के. देशपांडे, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. श्रोते व झोन कॉर्डिनेटर विना वाठोरे यांनी निर्णय घेत लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या २८ वर्षीय युवकाला हृदय दान करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात डॉ. मनोज दुराईराज व डॉ. शंतनू शास्त्री या हृदय शल्यचिकित्सकांच्या पथकाने हृदय काढले. सकाळी ११ वाजताच्या विमानाने ते नागपुरात येण्यास निघाले. दुपारी १२.३० वाजता हे विमान नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर उतरले. तेथून ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने केवळ सात मिनिटात न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये हृदय पोहचले. अवयवदात्याकडून हृदय प्राप्त होताच चार तासांत त्याचे प्रत्यारोपण होणे आवश्यक असते. त्यानुसार नियोजन करण्यात आले होते. पुण्यात हृदय काढण्याची प्रक्रिया सुरू असताना नागपुरात न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांनी प्रत्यारोपणाच्या तयारीला सुरुवात केली होती. ज्याला हृदय दान करायचे होते त्या २८ वर्षीय युवकाचे हृदय काढत नाही तोच रुग्णालयात हृदय प्राप्त झाले. पुढील दीड तासात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण करीत चार तासाच्या आतच गणेशचे हृदय पुन्हा धडधडायला लागले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. संचेती यांच्यासह डॉ. मनोज दुराईराज, डॉ. विवेक लांजे, कार्डीओलॉजिस्ट डॉ. निधीष मिश्रा, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. साहिल बन्सल, डॉ. सविता जयस्वाल, तंत्रज्ञ सुधाकर बरडे आदींचा सहभाग होता.हृदय प्रत्यारोपणाचे नागपूर चौथे केंद्रराज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर आता नागपूर हे हृदय प्रत्यारोपणाचे चौथे केंद्र ठरले आहे. विशेष म्हणजे, न्यू ईरा हॉस्पिटलमध्येच नागपुरातील पहिले यकृत प्रत्यारोपण झाले होते, आता नागपुरातील पहिले हृदय प्रत्यारोपणही याच रुग्णालयात झाले.आतापर्यंत नऊ हृदय नागपूरबाहेर‘झेडटीसीसी’ने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २०१३ ते आतापर्यंत ब्रेनडेड व्यक्तींकडून मिळालेले नऊ हृदय नागपूरबाहेर पाठविण्यात आले. नागपूरच्या न्यू ईरा हॉस्पिटलला आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली असलीतरी रुग्णाची नोंद झाली नव्हती. तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी यशस्वी हृदय प्रत्यारोपण झाले. यामुळे हृदय प्रत्यारोपणासाठी विदर्भाबाहेर जाणाऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरला.