लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागपूर पाेलीस आयुक्तालयांतर्गत १५ ते २१ मार्चदरम्यान कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. कामठी शहर व ग्रामीण भागात लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्याकरिता पाेलीस यंत्रणेतर्फे ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कामठी शहरात सर्वत्र बाजारपेठ बंद दिसून आली. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व बाजारपेठ बंद हाेती. अति वर्दळीचा चाैक असलेल्या फेरूमल गुजरी बाजार चाैक तसेच शहरातील विविध भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार नवीन कामठीचे ठाणेदार संजय मेंढे यांच्या नेतृत्वात कळमना मार्ग, जयस्तंभ चाैक, अजनी रेल्वे फाटक आदी ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. तसेच जुनी कामठीचे ठाणेदार विजय मालचे यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा टी-पाईंट, गाेयल टाॅकीज चाैक, कमसरी बाजार येथे नाकाबंदी लावून पाेलिसांनी ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली. लाॅकडाऊनदरम्यान शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून चारचाकी वाहनात दाेनपेक्षा अधिक नागरिक दिसून आल्यास तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे ठाणेदारद्वय संजय मेंढे व विजय मालचे यांनी सांगितले. यावेळी वाहतूक पाेलीस निरीक्षक प्रभाकर मत्ते, पाेलीस हवालदार शहनाज अन्सारी, अश्विनी बाेरकर, रूपेश मानवटकर, वैशाली दुरुगकर, अविनाश नन्नावरे, प्रफुल्ल इंगाेले, किशाेर साेमकुवर, दिलीप कुसराम, राजेश साखरे, सतीश माेहाड आदींचे पथक तैनात हाेते.