लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील शिल्पा स्टील पाॅवर लिमिटेड कंपनीच्या दाेन टॅंकरद्वारे रसायनयुक्त पाणी लगतच्या नाल्यामध्ये साेडल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडात्मक कारवाई केली आहे. या कंपनीचे वीज व नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे.
२६ जून राेजी एमआयडीसीतील शिल्पा कंपनीतून, दोन टॅंकरद्वारे नियमबाह्य पद्धतीने टाकळघाट फाटा लगतच्या मुरादपूर शिवारातील नाल्यामध्ये दोन टँकर रसायनयुक्त पाणी सोडत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी दोन टँकर जप्त केले हाेते व याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली. दरम्यान, उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी घटनास्थळी भेट देत चाैकशी केली. नाल्यात साेडलेल्या रसायनयुक्त पाण्याचे नमुने व टँकर चालकाने सांगितलेल्या कंपनीतील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठविले. तपासणी अहवालानुसार, रसायनयुक्त पाणी हे घातक द्रव्य असून, त्यापासून पर्यावरणास हानी, मानवी आराेग्यास धाेका व जनावरास धाेका पाेहोचेल, असे दिसून आले.
त्यानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार कंपनीचे कृत्य नियमबाह्य असल्याने, कंपनीची वीज व नळ कनेक्शन बंद करण्याचे आदेश एमआयडीसीला दिले आहे, तसेच पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने, न्यायालयाने कंपनीची २५ लाखांहून अधिक रुपयांची सिक्युरिटी जप्त करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी स्पष्ट केले आहे.