खापरखेडा : लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या आदेशान्वये सर्व दुकाने सायंकाळी ४ वाजता बंद करण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर चिचाेली (खापरखेडा), ता. सावनेर ग्रामपंचायत प्रशासन व काेराेना दक्षता समितीने दंडात्मक कारवाई व दुकाने सील करायला सुरुवात केली आहे.
ही माेहीम रविवार (दि. १८)पासून सुरू करण्यात आली आहे. त्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने खापरखेडा येथील सर्व दुकानदारांना त्यांची दुकाने सायंकाळी ४ वाजता बंद करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. काही दुकानदार या सूचनांचे उल्लंघन करीत असल्याने ग्रामपंचायत प्रशासन व काेराेना दक्षता समितीने संयुक्तरीत्या कारवाई करीत चिकन मार्केटसह अन्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी दाेन हजार रुपयांप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय, साेनू माेटर्स नामक दुकान सील केले. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी लंगडे यांनी स्पष्ट केले. ही कारवाई ग्रामविकास अधिकारी लंगडे, नरेंद्र डवरे, धीरज पौनीकर, रमेश छापले, देवा वैद्य यांच्या पथकाने केली.