लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शहर व तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या मोठी नसली तरी दररोज आढळणारे पॉझिटिव्ह रुग्ण प्रशासनाच्या चिंतेचे विषय ठरत आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. नगर पंचायत प्रशासन व भिवापूर पाेलिसांनी बुधवारी रस्त्यावर उतरत ३० जणांवर कारवाई करीत दंड वसूल केला.
शहर व ग्रामीण भागात दररोज २-४ रुग्ण आढळत आहेत. शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचीही चाचणी केली जात आहे. मात्र नागरिक अद्यापही गंभीर नसून, मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचा बोजवारा उडाला आहे. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, खंडविकास अधिकारी माणिक हिमाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत यांच्या मार्गदर्शनात यंत्रणेतील कर्मचारी काेराेना नियंत्रित करण्यासाठी लढा देत आहेत. बुधवारी ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह वाहतूक पोलीस राकेश त्रिपाठी, राजन भोयर, नगर पंचायतचे कर्मचारी परसराम वावरे, सुनील कलसे, भगवान वाघमारे, रोशन गजभिये आदीच्या संयुक्त पथकाने राष्ट्रीय मार्गावर नाकाबंदी परिसरात कारवाई करीत विना मास्क फिरणाऱ्या ३० जणांवर प्रत्येकी २०० रुपये असा दंड वसूल केला.