लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात केंद्र शासनाच्या आधारभूत धान खरेदी कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह फेडरेशन व महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून एकूण सात खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १,८५१ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला आहे, परंतु अद्यापही २,२४४ शेतकऱ्यांचा धान खरेदी होणे शिल्लक आहे. धान खरेदीची अंतिम तारीख ३१ मार्चअसून, उर्वरित १३ दिवसांत २,२४४ शेतकऱ्यांकडील धान खरेदी करणे आदिवासी विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह फेडरेशन यांच्यापुढे आव्हानच आहे. अशा परिस्थितीत धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाचे एकूण सहा खरेदी केंद्र असून, या केंद्रांतर्गत १३० गावे जोडली आहेत. तालुक्यातील भोंदेवाडा (डोंगरी), हिवराबाजार, भंडारबोडी (महादुला), पवनी देवलापार (बांद्रा) व टुयापार येथे ही खरेदी केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत या केंद्रांवर ८५८ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत रामटेक तालुका शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या खरेदी केंद्रावर १,१८६ शेतकऱ्यांचा धान खरेदी केला गेला. रामटेकच्या एका खरेदी केंद्रावर १,१८६ शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जातो, तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण सहा खरेदी केंद्रांच्या माध्यमातून केवळ ८५८ शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जातो. यात आदिवासी विकास महामंडळाची अनास्था असल्याचे धान उत्पादक शेतकऱ्यांत बाेलले जात आहे.
अत्यंत ढिसाळ व कासवगतीने महामंडळांच्या सहा केंद्रांवर खरेदी केली जात असून, हा वेग वाढविणे गरजेचे आहे. मात्र, या केंद्रांवर शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जाईल की नाही, अशी शंकाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. महामंडळांच्या सहा खरेदी केंद्रांची गती पाहता, आपला धान खरेदी केला जाणार नाही, या भीतीने अनेकांनी आपले सातबारा घेऊन नव्याने रामटेक तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्था यांच्याकडे नोंदणी केली आहे. या ठिकाणी आतापावेताे ३,२३७ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. खरेदी-विक्री संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त १,१८६ शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात आला असून, येत्या ३१ मार्चपर्यंत उर्वरित २,०५१ शेतकऱ्यांचा धान खरेदी करणे बाकी आहे. केवळ १३ दिवसांत एवढ्या शेतकऱ्यांचा धान खरेदी करणे अशक्य आहे. अशा स्थितीत शासनाने ठरल्याप्रमाणे ३१ मार्चला धान खरेदी बंद केल्यास शेकडो शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाने खरेदीसाठी मुदतवाढ देणे क्रमप्राप्त असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत रामटेकचे सहायक निबंधक रवींद्र वसू यांना विचारणा केली असता, सध्यातरी खरेदीची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत असून, शक्य तितक्या शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुदतवाढ मिळेल किंवा नाही व सर्व नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा धान खरेदी केला जाईलच, याची हमी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना संपर्क केला असता, संपर्क हाेऊ शकला नाही.