लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : आदिवासी विकास महामंडळाच्या महादुला (ता. रामटेक) येथील खरेदी केंद्रावर सातबाराची नाेंद न करता धानाची खरेदी करण्यात आल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे चुकारे वांध्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त धान उत्पादकांनी गुरुवारी (दि. ६) या खरेदी केंद्रावर आंदाेलन करीत खरेदी केंद्राच्या गाेदामाला टाळे ठाेकले. मात्र, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मध्यस्थी करीत शेतकऱ्यांना शांत केल्याने आंदाेलन मागे घेण्यात आले.
शासकीय धान खरेदी केंद्रावर विशिष्ट पद्धतीने नाेंदणी, माेजमाप करून चुकारे दिले जातात. मात्र, आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर काही शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाराची नाेंद न करताच त्यांच्याकडील धानाचे माेजमाप करण्यात आले आहे. शिवाय, त्या शेतकऱ्यांना रीतसर पावतीही देण्यात आली आहे. यात महादुला येथील राधेश्याम बादुले, रामू डडुरे, बापुराव डडुरे, अर्जुन काठाेके व आसाेली येथील महादेव कडबे या शेतकऱ्यांचा समावेश आहे. नारायण झाडे व सुनील काठाेके, दाेघेही रा. महादुला, ता. रामटेक यांच्या धानाचे माेजमाप करूनही त्यांना पावती देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा करण्यात न आल्याने चुकारे मागायचे कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिणामी, शेतकऱ्यांमध्ये असंताेष निर्माण झाला आणि त्यांनी गुरुवारी दुपारी महादुला येथील धान खरेदी केंद्रावर आंदाेलन करायला सुरुवात केली. काहींनी साेबत धानही आणले हाेते. यावेळी शेतकऱ्यांनी आधी चुकारे द्या, नंतर गाेदामातील धानाची उचल करा, अशी मागणी रेटून धरत गाेदामाला टाळे ठाेकले. माहिती मिळताच तहसील बाळासाहेब मस्के आंदाेलनस्थळी दाखल झाले. त्यांना कलम १४४ लागू असल्याने सध्या आंदाेलन न करण्याची सूचना करीत शेतकऱ्यांना शांत केले. चर्चेदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी फाेनवर संपर्क साधला. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी आंदाेलन मागे घेतले. आंदोलनात बलदेव कुमरे, भागवत माेहने, नारायण झाडे, याेगेश बडवाईक, रामू डडुरे, दिनेश बडवाईक, अर्जुन काठाेके, सुनील काठाेके, महादेव कडबे, राधेश्याम बादुले, पांडुरंग कुथे, नत्थू नकाते यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले हाेते.
...
धान विक्री पद्धती
शासनाच्या खरेदी केंद्रांवर धान विकायचे असल्यास शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सातबारा सादर करून आधी नाेंदणी करावी लागते. त्यानंतर धानाच्या माेजमापाचा दिवस शेतकऱ्यांना कळविला जाताे. माेजमाप झाल्यानंतर रीतसर पावती दिली जाते. त्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा केली जाते. महादुला येथील केंद्रावर काही शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप सातबारा न घेता करण्यात आले तर, काही शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करून त्यांना पावती दिली नाही.
...
पूर्वसूचनेविना खरेदी बंद
रामटेक तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्चपासून बंद करण्यात आले. तत्पूर्वी काही शेतकऱ्यांना २६ मार्च राेजी संदेश पाठवून धान माेजायला आणण्याबाबत कळविण्यात आले. त्याअनुषंगाने भंडारबाेडी येथील पांडुरंग कुथे व नत्थू नकाते तसेच महादुला येथील नारायण झाडे यांनी खरेदी केंद्रावर धान नेले असता, त्यांना २५ मार्च राेजी खरेदी बंद करण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडील धान माेजण्यास नकार देण्यात आला. विशेष म्हणजे, याबाबत शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली नव्हती.