भिवापूर : लोकन्यायालयातून होणारा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. द्वेष संपुष्टात येतात. नातेसंबंधात कटुता येत नाही. आपसातील वाद सामंजस्याने सोडविणे हेच लोकन्यायालयाचे उद्दिष्ट असल्याचे मत भिवापूरचे न्या. विनोद डामरे यांनी व्यक्त केले.
भिवापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. १२) आयोजित लोकअदालतप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी उमरेडचे सहदिवाणी न्यायाधीश ए. व्ही. पंडित, पॅनल प्रमुख ॲड. पी. एल. नागोसे, खंडविकास अधिकारी राेशनकुमार दुबे, नरहरी पेंदाम यांच्यासह राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते. या लोकअदालतीत प्रलंबित दिवाणी दावे व फौजदारी प्रकरणांसह बँक व ग्रामपंचायतीचे दाखलपूर्व एकूण १९२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दिवाणी स्वरूपाचे एक तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी ग्रामपंचायतीची ५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १ लाख ११ हजार ८८२ रुपयाची वसुली करण्यात आली. तसेच बँक ऑफ इंडियाच्या भिवापूर व कारगाव शाखेंतर्गत ८ प्रकरणे निकाली काढत १ लाख ८७ हजार रुपयाची वसुली करण्यात आली. अशाप्रकारे लोकन्यायालयातून एकूण ६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये २ लाख ९८ हजार ८८२ रुपयाची वसुली करण्यात आली. लोकअदालतीच्या आयाेजनासाठी न्यायालयीन कर्मचारी राजेश झोडे, योगेश ढोक, अतुल राखडे, एम. सी. श्रीवास, पोलीस कर्मचारी श्रीचंद पवार यांनी सहकार्य केले.