लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुणवंतांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगल्भतेचे द्योतक आहे. हा सत्कार त्या व्यक्तीचा नसतो तर गुणवत्तेवरून समाजाने समाजाचा केलेला सन्मान असतो. मात्र, आजकाल दिले जात असलेले पुरस्कार हे विशिष्ट हेतूने प्रेरित असतात. अशा पुरस्कारांनी समाजाच्या विघटित मानसिकता प्रतिबिंबित होत असते, असे मत कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी प्रसिद्ध अभिनेत्री व समाजसेविका स्मिता पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मिता स्मृती पुरस्काराचे आयोजन सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये पार पडले. या सोहळ्यात समाजसेवेत उल्लेखनीय योगदानासाठी भोसला मिलिटरी स्कूल व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. शैलेश जोगळेकर व रंगभूमीवर दिलेल्या योगदानासाठी डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी आ. अनिल सोले, प्रतिष्ठानचे गिरीश गांधी, नगरसेविका प्रगती पाटील उपस्थित होते.
परंपरेच्या आधारावर नव्या पिढीचे निर्माण होत नाही तर पिढीची जडणघडण होण्यासाठी त्यांना चालते फिरते प्रेरणास्रोत हवे असतात. समाजाची सत्कारवृत्ती त्या समाजाचा विवेक प्रतिपादित करतो. कोणत्या लोकांचा सत्कार केला जात आहे, त्यावर त्या समाजाची प्रगल्भता स्पष्ट होत असल्याचे डॉ. वेदप्रकाश मिश्रा यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. परिचय वैदेही चवरे-सोईतकर यांनी करवून दिला. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले तर आभार प्रगती पाटील यांनी मानले.
* मेरो समर्पणमध्ये पुरस्कार राशी समर्पित
डॉ. शैलेश जोगळेकर यांनी पुरस्कारादाखल मिळालेली २१ हजार रुपयाची राशी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मेरा समर्पण पात्रात प्रदान करत असल्याची घोषणा यावेळी केली.
........