निशांत वानखेडे
नागपूर : दाेन साेबत्यांच्या आधारे महामानवाला अभिवादन करण्यासाठी ‘ताे’ तेलंगणाहून नागपूरला आला हाेता. दीक्षाभूमीच्या अलाेट गर्दीत दुपारी २.३० वाजता साेबत्यांपासून ताे तुटला. त्याहून वेदनादायी म्हणजे त्याला बाेलताही येत नसल्याने कुणाला व्यथाही सांगू शकत नव्हता. या परिसरात ताे सैरभैर झाला हाेता. अखेर रात्री ९.३० वाजता ‘सहयाेग’च्या कार्यकर्त्यांनी त्याचा गाव ते पाेलीस असा संवाद साधून त्याची भेट घडवून दिली. साेबत्यांना पाहताच त्याने धावतच घट्ट मिठी मारली आणि अश्रूंचा बांध फुटला.
तेलंगनाच्या आशिलाबादजवळ शिरपूर या खेड्यातून विक्रम धुरके, ज्ञानेश्वर धुरके व पुरुषाेत्तम कुकुडकर हे तिघे दीक्षाभूमीवर आले हाेते. त्यातला पुरुषाेत्तम याला बाेलता येत नाही. येथे फिरताना दुपारी पुरुषोत्तमची अचानक ताटातूट झाली. तेव्हापासून धुरके बंधूंनी अख्खा दीक्षाभूमीचा परिसर त्याला शाेधण्यासाठी पिंजून काढला पण त्याचा पत्ता लागला नाही. त्याच्या खिशात गावातील एक व धुरके यांचा एक अशा दाेन माेबाईल नंबरची चिठ्ठी दिली हाेती. अखेर रात्री ८.३० वाजता धुरके बंधू सहयाेगच्या स्टाॅलवर पाेहचले. सहयाेगचे राहूल गाणार व प्रशांत मेश्राम यांनी शाेधाशाेध सुरू केली.
या काळात भटकत भटकत पुरुषाेत्तम दीक्षाभूमीच्या आतमध्ये पाेलिसांजवळ पाेहचला. त्याची अवस्था पाहून पाेलिसांना प्रकार लक्षात आला. त्याच्या चिठ्ठीनुसार पाेलीस अधिकारी संजय सज्जनवार यांनी आधी धुरके यांना संपर्क केला पण झाला नाही. नंतर गावच्या माेबाईलवर संपर्क केला. त्यांना हा प्रकार सांगितला. गावातील व्यक्तिने धुरके यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला पण यश आले नाही. इकडे सहयाेगच्या कार्यकर्त्यांनीही गावाकडे संपर्क केला असता, पुरुषाेत्तम पाेलिसांच्या स्टाॅलवर असल्याचे लक्षात आले. त्यांनी सज्जनवारांचा माेबाईल घेत त्यांना संपर्क केला. मात्र कर्तव्यावर असलेल्या सज्जनवार यांनी काॅल रिसिव्ह केला नाही. ड्यूटी संपवून घरी गेल्यानंतर ९.३० वाजता त्यांनी काॅल घेतला आणि मार्ग मिळाला. कार्यकर्त्यांनी जावून त्यांची भेट घालून दिली. त्या सर्वांनी सहयाेगचे आभार माणून दीक्षाभूमीवरून परतीचा मार्ग धरला.
हरवलेल्या १३०० लाेकांची करून दिली भेट
दीक्षाभूमीवर ताटातूट झालेल्या १३०० लाेकांनी सहयाेग स्टाॅलवर नाेंदणी झाली. यातील १४० लाेकांची स्टाॅलजवळच भेट घडवून देण्यात आली. यात लहान मुले व ज्येष्ठांचा समावेश अधिक हाेता. दाेन दिवसांपासून असल्याने माेबाईल बंद पडल्याने ताटातूट झालेले तरुणही अधिक हाेते. त्यांनाही मदत करण्यात आल्याचे राहुल गाणार यांनी सांगितले. विवेक जंगले, अश्विन बागडे, रवी बागडे, प्रशांत मेश्राम, कपेश जीवनतारे, प्रफुल्ल रंगारी, प्रीती पाटील, सुरेखा गाणार, वंशिका जंगले, स्वप्ना रंगारी, अग्रसेन मानकर यांनी हरविलेल्यांच्या भेटीसाठी अविरत सेवा दिली. याच स्टाॅलवर डाॅ. चेतना वाहाने, डाॅ. श्रद्धा, शुभांगी जंगले-गजभिये यांनी १००० वर नागरिकांना वैद्यकीय सेवासुद्धा दिली.