लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी मास्क लावून नसलेल्या एका वकिलाला टोकल्यामुळे त्या वकिलाने चिडून सुमारे अर्धा तास गाेंधळ घातला. दरम्यान, त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिविगाळही केली. या प्रकारामुळे उच्च न्यायालयात खळबळ माजली.
अजय डोणगावकर असे संबंधित वकिलाचे नाव आहे. कोरोना संक्रमनामुळे उच्च न्यायालयामध्ये प्रत्येकाने मास्क लावून वावरणे आवश्यक आहे. मास्कशिवाय कुणालाही परिसरात प्रवेश दिला जात नाही. असे असताना डोणगावकर यांनी मास्क न लावता उच्च न्यायालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून मास्क लावण्यास सांगितले. त्यावरून डोणगावकर चिडले. त्यांनी मोठमोठ्याने बोलण्यास सुरुवात केली, तसेच ते बळजबरीने न्यायालयाच्या इमारतीकडे चालत गेले. दरम्यान, ते पोलीस कर्मचाऱ्यांना शिविगाळ करायला लागले. मनात येईल त्याप्रमाणे ओरडायला लागले. डोणगावकर यांचा गोंधळ सुमारे अर्धा तास चालला. त्यानंतर पोलिसांनी पुढील गोंधळ टाळण्यासाठी डोणगावकर यांना पकडून चौकीत आणले. त्याचवेळी हायकोर्ट बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चौकीत पोहचून डोणगावकर यांची कानउघाडणी केली. पोलिसांनीही कारवाईची तंबी दिली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून डोणगावकर नरमले व त्यांनी कारवाई टाळण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना माफीपत्र लिहून दिले. परिणामी, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही.
वकिलाचे वर्तन अशोभनीय
संबंधित वकिलाचे वर्तन अशोभनीय होते. त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीविषयी राग होता तर, त्यांनी योग्य पद्धतीने कृती करायला हवी होती. आपण कसे वागावे याची जाणिव वकिलांना असणे गरजेचे आहे. हा वकील हायकोर्ट बार असोसिएशनचा सदस्य नाही.
----- ॲड. प्रफुल्ल खुबाळकर, सचिव, हायकोर्ट बार असोसिएशन.