नागपूर : येथील अशमी ट्रान्सपोर्टचे संचालक प्यारे खान यांनी नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दोन टँकरमध्ये एकूण ३२ टन ऑक्सीजन देऊ केला आहे. यासाठी त्यांनी तब्बल एक कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी भिलाई येथून १६ टन ऑक्सीजन असलेले एक टँकर पाठविले होते. बुधवारी पुन्हा बेल्लारी येथून १६ टन ऑक्सीजनचे दुसरे टँकर पाठविले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये समाजातील दानदात्यांना आवाहन करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खरेदीसाठी सहकार्याचे आवाहन करण्यात आले होते. दानदात्यांनी रक्कम थेट ऑक्सिजन व व्हेंटिलेटर विक्रेत्या कंपनीकडे डिजिटल ट्रान्सफर करावी, असे सुचविले होते. आपल्या मानस ग्रुपच्या वतीने ५० हजारांची मदत देऊन त्यांनी यात पुढाकार घेतला होता. त्यानंतर अनेक दानदाते पुढे आले होते. प्यारे खान यांनीही छत्तीगसड राज्यातील भीलाई येथून ५० लाख रुपये किमतीचा १६ टन ऑक्सिजन खरेदी करून रुग्णांना दिला होता. आता पुन्हा तेवढाच ऑक्सिजन बेल्लारीवरून खरेदी केला आहे. यातून ऑक्सिजनचे ११६ युनिट खरेदी झाले आहेत. एका आठवड्यात एक कोटी रुपयांचा ऑक्सिजन त्यांनी दिला आहे. नागपुरात रुग्णसंख्या वाढली असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधांचा तुटवडा जाणवत आहे.अशा परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी आपण काहितरी करू शकलो, यावर प्यारे खान यांनी समाधान व्यक्त केले आहे.