नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन वर्षांपूर्वी कतर एअरवेजची सेवा बंद करण्यात आली होती. पण, पुन्हा कतर एअरवेजची नागपूर-दोहा उड्डाण येत्या जून महिन्यात सुरू होत आहे. या एअरलाईन्सचे ग्राऊंड हँडलिंग एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लि. (एआयएएसएल) करणार आहे. या एअरलाईन्ससोबत एआयएएसएल एकूण तीन एअरलाईन्ससाठी ग्राऊंड हँडलिंगची जबाबदारी सांभाळेल.
नागपूर विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सची स्वत:ची ग्राऊंड हँडलिंग एजन्सी आहे, तर एअर इंडियासाठी त्यांची कंपनी एआयएएसएल पहिलीच जबाबदारी सांभाळत होती. त्यात एआयएएसएलला आता गो एअरचेही काम मिळाले. काही वर्षांपूर्वी गो एअरचे ग्राऊंड हँडलिंगचे काम करणाऱ्या एजन्सीचे कंत्राट संपले. तेव्हापासून गो एअरने ही जबाबदारी एआयएएसएलला दिली. आता कतर एअरवेजदेखील जबाबदारी देणार असल्याने रोजगार निर्माण होणार आहे.
२०२० मध्ये लॉकडाऊनच्या कारणाने कतर एअरवेजने नागपूर-दोहा उड्डाण बंद केली होती. कतर एअरवेज नागपूर-दोहासाठी एअरबस ३२० विमान आहे. हे विमान १४४ सीटर असून, १२ बिझनेस क्लास व १३२ इकॉनॉमी क्लासच्या सीट यात आहेत.