मोरेश्वर मानापुरे, नागपूर: शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमग्न झाले. त्याचा परिणाम कतार एअरवेजच्या विमानावर झाला. दोहा येथून उड्डाण भरलेले विमान नागपूरऐवजी हैदराबादला डायव्हर्ट करण्यात आले. त्यानंतर १८ तास उशिराने नागपुरात पोहोचले. परंतु, मुसळधार पावसाचा अन्य घरगुती विमानांवर काहीही परिणाम झाला नाही.
प्राप्त माहितीनुसार, कतार एअरवेज कंपनीच्या क्यूआर-५९० दोहा-नागपूर विमानाने शुक्रवारी रात्री ८.१० वाजता दोहा येथून उड्डाण भरले. हे विमान ठराविक वेळेनुसार शनिवारी पहाटे २.५० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर पोहोचणार होते. परंतु मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यतेमुळे वैमानिकाने विमानाला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोहा येथून आलेले विमान शनिवारी पहाटे ३.३८ वाजता हैदराबादच्या विमानतळावर उतरले. त्यानंतर प्रवाशांना नागपूर पोहोचण्यासाठी तब्बल १८ तास वाट पाहावी लागली. अखेर हे विमान शनिवारी रात्री ८.४५ वाजता नागपुरात पोहोचले.
प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्याकडे कानाडोळा
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासन नागरिकांच्या सुविधांसाठी माहितीची आदानप्रदान करीत बचाव कार्यात मग्न होते. तर दुसरीकडे नागपूर विमानतळाचे अधिकारी अशा कठीण समयी विमानासंदर्भात माहिती देण्यास नकार देत होते. एक दुसऱ्याकडे बोट दाखवित होते. संकटकाळात प्रवाशांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळणे आवश्यक असते. परंतु विमानतळ व्यवस्थापनासह विमान कंपनीचे अधिकारीही माहिती देण्यास नकार देत होते. त्यामुळे प्रवाशांच्या नातेवाईकांमध्ये रोष होता.