लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्यू नेट कंपनीच्या नावाआड चेन मार्केटिंगचा गोरखधंदा सुरू करून शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली. येथून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.क्यू नेट कंपनीच्या बनवाबनवीचा गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने भंडाफोड करून २ डॉक्टरांसह १० आरोपींवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यातील आरोपी डॉ. कविता खोंड, मृणाल धार्मिक, प्रशांत धार्मिक, आशिष लुणावत, किशोर भंडारकर, मंगेश चिकारे, रुतुजा चिकारे, प्रशांत डाखोळे (डाखोडे), प्रज्ञा डाखोळे आणि श्रीकांत रामटेके यांनी काही वर्षांपूर्वी क्यू नेट नामक कंपनी सुरू केली. या कंपनीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी अभिकर्तेही नेमले. या कंपनीचे सभासद बनलेल्यांना देश-विदेशात पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, शॉपिंग, कॉर्पोरेट फायनान्स, टेलिकम्युनिकेशन, ई-कॉमर्स, लाईफ स्टाईलसोबतच विविध कंपन्यांच्या उत्पादनाची माहिती दिली जात होती. कंपनीची क्यू व्हीआयपी क्लब मेंबरशिप घेतल्यास मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोठी सूट तसेच मोफत भेटवस्तू देण्याचेही प्रलोभन दाखविले जात होते. एक सभासद बनल्यास त्याला आणखी सभासद आणि त्या सभासदाला पुन्हा तसेच आमिष दाखवून दुसरे सभासद बनवून (ग्राहकांची साखळी) वेगवेगळ्या आर्थिक फायद्याचीही माहिती दिली जात होती. एका सभासदाच्या उलाढालीवर थेट १० टक्के कमिशन देण्याचे आमिष मिळाल्यामुळे ते मिळविण्यासाठी सभासद झालेली मंडळी आणखी ग्राहकांना या कंपनीशी संलग्न करायची. अशाप्रकारे ग्राहकांची संख्या वाढवून उपरोक्त आरोपींनी बक्कळ पैसा जमवला. मात्र, ज्यांनी आपली रक्कम यात गुंतवली ते परतावा मागू लागल्याने आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे प्रकरण गेल्या वर्षी पोलिसांकडे गेले. चौकशीअंती आरोपींनी क्यू नेटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना गंडा घालतानाच तंत्रज्ञानाचा गैरफायदा उठवत बनावट मेल आयडी, अकाऊंट तयार केल्याचेही उघड झाले. त्यात त्यांनी दिशाभूल करणारी माहिती अपलोड केल्याचेही उजेडात आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला.उपरोक्त आरोपींपैकी डॉ. कविता अविनाश खोंड, प्रशांत दत्तात्रय धार्मिक, त्याची पत्नी मृणाल धार्मिक, प्रशांत श्यामराव डाखोळे आणि त्याची पत्नी प्रज्ञा डाखोळे या पाच जणांना अटक केली. त्यांची ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. अन्य आरोपी आशिष लुणावत, किशोर भांडारकर, मंगेश चिकारे, त्याची पत्नी ऋतुजा चिकारे तसेच श्रीकांत रामटेके फरार आहे. पोलीस त्यांचा शोध आहेत. दरम्यान, अटकेतील आणि फरार आरोपींच्या घरी तसेच कार्यालयात झाडाझडती घेऊन पोलिसांनी या फसवणूक प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली.
क्यू नेट कंपनीच्या नावाआड गोरखधंदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:22 AM
क्यू नेट कंपनीच्या नावाआड चेन मार्केटिंगचा गोरखधंदा सुरू करून शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या घर आणि कार्यालयाची पोलिसांनी झाडाझडती घेतली. येथून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देआरोपी डॉक्टरांच्या घर, कार्यालयाची झाडाझडती : मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त