लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उद्घाटन केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) क्यूआर कार्डचा उपयोग एटीएम म्हणून ग्राहकांना करता येणार नाही. त्यामुळे डाक विभागाच्या बँकेच्या खातेदारांची निराशा होणार आहे. त्यामुळे या बँकेच्या खातेदारांची संख्या वाढणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.क्यूआर आणि एमटीएम कार्डमध्ये अंतर‘आपली बँक आपल्या दारी’ या घोषवाक्यानुसार डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात करण्यात आली. पण क्यूआर कार्डचा एटीएम म्हणून उपयोग होत नसल्यामुळे खातेधारक नाराज आहेत. त्यामुळे प्रत्येक शाखांना दिलेले खातेदार सुरू करण्याचे लक्ष्य क्यूआर कार्डच्या मर्र्यादित उपयोगामुळे आव्हान ठरणार आहे. या योजनेंतर्गत शून्य बॅलेन्समध्ये खेड्यापाड्यांमधील डाक विभागात बचत आणि चालू खाते उघडल्या जात आहेत. शासनाच्या आवाहनानुसार आठ दिवसांत अनेकांनी आपले खाते या बँकेत सुरू केले आहे. पण सर्व खातेदारांना क्यूआर कार्ड आणि बँकेच्या एटीएम कार्डामधील कार्ड प्रणालीचे अंतर समजले नाही. हे कार्ड मोबाईल अॅपशी सतत जोडलेले राहणार आहे.कॅशलेशसाठी ‘क्यूआर कार्ड’क्यूआर कार्डचा वापर स्मार्ट सेल्यूलरद्वारे मनी ट्रान्सफरसाठी आणि एखाद्या स्टोअरमध्ये व्यवहारासाठी सोईचा आहे. पण पोस्ट बँक आणि पोस्टमनच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाशिवाय कॅश मिळविता येणार नाही. कॅशलेसच्या आर्थिक व्यवहाराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आयपीपीबी अंतर्गत पोस्ट बँकेचे क्यूआर कार्ड सेवेत आणल्याचे सूत्रांनी सांगितले.काय आहे ‘क्यूआर कार्ड’एटीएमसारख्या चौकोनी कार्डासारखेच ‘क्यूआर कार्ड’ आहे. डिव्हाईस स्कॅनर फिरविताच कार्डाची संपूर्ण माहिती समोर येते. जपानी तंत्रज्ञानाने विकसित क्विक रिस्पॉन्स कोड विकसित केले आहे. क्यूआर संकेताचा वापर सर्वप्रथम मोटार वाहन उद्योगात झाला. मेट्रिक बारकोड एकाप्रकारे ट्रेडमार्कचे कार्य करीत असल्यामुळे क्यूआर कार्डचा उपयोग व्यवहारात सुरू झाला. बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची योग्य खात्री पटत असल्यामुळे आता क्यूआर कार्ड मोठ्या प्रमाणात अस्तित्वात येत आहे.
क्यूआर कार्ड एटीएममध्ये चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:58 AM