नागपूर विद्यापीठ : ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे १०० हून अधिक विद्यार्थी ‘रडार’वरनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये विविध त्रुटी आढळल्या होत्या. सुधारित गुणपत्रिका मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरला होता. मात्र परीक्षेला गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील सुधारित गुणपत्रिकेसाठी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरल्याची बाब समोर आली आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या १०० हून अधिक असून यामुळे परीक्षा विभागातील अधिकारी हैराण झाले आहे. यामागे गुणवाढीचे कुठले ‘रॅकेट’ तर कार्यरत नाही ना यादृष्टीने प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे ही धक्कादायक बाब समोर आली आहे.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ‘आॅनलाईन’ झाली आहे. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व इतर माहिती ‘आॅनलाईन’ पाठवावी लागते. मात्र अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे नोंदणी क्रमांक, विषय व नावे अचूकपणे पाठविले नाही. ‘डाटा मिसमॅच’ झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये त्रुटी राहिल्या. या त्रुटी दूर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून विद्यार्थ्यांना ‘वॉन्टिंग’ अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हजारो विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरले.मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते. प्रत्येक अर्ज सखोलपणे तपासण्यात आला. सुरुवातीला सर्व काही आलबेल वाटत असतानाच परीक्षेलाच गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे अर्ज भरल्याची बाब लक्षात आली. सुरुवातीला याला गंभीरतेने घेण्यात आले नाही. मात्र ही संख्या वाढत गेली व १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी असे अर्ज भरल्याचे आढळले. परीक्षेला गैरहजर असणारे विद्यार्थी एकाचवेळी असे अर्ज भरणे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. त्यांना कुठली तरी शाश्वती असल्याशिवाय ते असे पाऊल उचलणार नाहीत. यामागे कुठले ‘रॅकेट’ आहे का यादृष्टीने चौकशी सुरू असल्याची माहिती गोपनीयतेच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिली. जर यंदा ‘आॅनलाईन’ प्रणाली नसती तर असे प्रकार समोरच आले नसते. या प्रणालीमुळेच अनेक बाबी समोर येऊ शकतात, असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)सर्व प्रकरणे शिस्तपालन समितीकडेपरीक्षेला गैरहजर असूनदेखील सुधारित गुणपत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील आठवड्यात ७३ होती. ती आता शंभराहून अधिक झाली आहे. यातील सर्वात जास्त विद्यार्थी हे अभियांत्रिकी शाखेतीलच आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज जमा करण्यात आले असून चौकशीसाठी शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चौकशी सुरू, ‘आॅनलाईन’चा फायदापरीक्षेला गैरहजर असूनदेखील एकाच वेळी ‘वॉन्टिंग’ अर्ज भरणे ही बाब आश्चर्यजनक आहे. ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे असे विद्यार्थी लक्षात आले. हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काही गैरप्रकार आहे, याची चौकशी सुरू आहे. यावर आत्ताच काही भाष्य करणे योग्य होणार नाही, असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. ‘आॅनलाईन’मुळे परीक्षा प्रणाली सक्षम होत असून भविष्यात पूर्ण प्रणाली पारदर्शक होईल. त्यामुळे गैरप्रकारांना थाराच राहणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
परीक्षा विभागात गुणवाढीचे ‘रॅकेट’?
By admin | Published: October 16, 2016 2:45 AM