लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : भरधाव क्वाॅलिसने माेटरसायकलला मागून धडक दिली आणि चालकाचा ताबा सुटल्याने क्वाॅलिस दुभाजकावर चढली. यात दाेघे गंभीर व दाेघे किरकाेळ असे चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सावनेर शहरातील भीम चाैकात साेमवारी (दि. २५) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
क्वॉलिसचालक मंगेश शेषराव वाढीकर (२९) व गणेश तुळशीराम गायधने (३०) दोघेही रा. होळी चौक, सावनेर अशी गंभीर जखमींची नावे असून, किरकाेळ जखमींची नावे कळू शकली नाहीत. मंगेश व गणेश एमएच-१६/आर-०१५५ क्रमांकाच्या क्वाॅलिसने सावनेर शहरातील कमल चाैकातून गांधी चाैक मार्गे भीमचाैकाच्या दिशेने जात हाेते. या अनियंत्रित क्वाॅलिसने भीमचाैकात समाेर असलेल्या माेटरसायकलला धडक दिली आणि नंतर ती दुभाजकावर आदळली.
यात माेटरसायकलवरील दाेघेही खाली काेसळले व काही दूर फरफटत गेले. मात्र, त्यांना फारशी दुखापत झाली नाही. मात्र, क्वाॅलिसमधील मंगेश व गणेश गंभीर जखमी झाले. अपघात हाेताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी क्वाॅलिसखाली अडकलेली माेटरसायकल बाहेर काढली तसेच दाेन्ही जखमींना सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.