नागपूर : दसऱ्यापूर्वी सुरू झालेली आंबिया बारच्या संत्र्यांची आवक कळमना बाजार समितीत वाढली असून, दर्जेदार संत्र्यांला चांगला भाव मिळत आहे. कळमन्यात १८ ते २५ रुपये किलो भाव आहे, तर किरकोळ बाजारात मध्यम आकाराची संत्री ६० रुपये, तर चांगल्या संत्र्याला १०० रुपये डझन भाव आहे. सध्या कळमन्यात दोन टन क्षमतेच्या २०० पेक्षा गाड्यांची अर्थात ४०० टन संत्र्याची आवक आहे. आंबिया संत्री आंबट व गोड असल्यामुळे लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आवक १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे व्यापारी म्हणाले.
कळमना फ्रुट मार्केट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून अर्थात कळमेश्वर, मोहपा, काटोल, नरखेड, कोंढाळी या भागात आवक आहे. मागणी वाढल्यामुळे विक्रीत वाढ झाली आहे. यंदा गेल्यावर्षीप्रमाणेच संत्र्यांची आवक आहे.
कृषितज्ज्ञ श्रीधर ठाकरे म्हणाले, यावर्षी अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पाच लाख टन अपेक्षित उत्पादनापेक्षा जवळपास तीन लाख टन होण्याची शक्यता आहे. सध्या भाव कमी असला तरीही ऊन लागल्यानंतर आठवड्यातच ३५ हजार रुपये टनापर्यंत भाव जाईल. उत्पादकांना तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे यंदा संत्रा अडचणीत आला आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीत पाण्याचा निचरा कमी झाला, शिवाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे क्वाॅलिटीवर परिणाम झाला. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पिकाला फटका बसला. विदर्भात अमरावती जिल्ह्यात संत्र्याची लागवड ८० हजार हेक्टर, तर नागपूर जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर होते. विदर्भात अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे जास्त उत्पादन होते.
५० एमएम खालील संत्री जातात वाया
५० एमएम खालील आकाराच्या अर्थात छोट्या संत्र्याला मागणी कमी असल्यामुळे उत्पादनापैकी ३० टक्के संत्री वाया जातात. ही संत्री गोड असतात. पण विदर्भात प्रोसेसिंग युनिट नसल्यामुळे त्यावर प्रक्रिया करता येत नाही. या संत्र्याच्या ज्यूसला चांगला भाव मिळतो. बाबा रामदेव यांचे प्रोसेसिंग युनिट मिहानमध्ये डिसेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
बांगलादेशात जाणार दीड लाख टन संत्रा
विदर्भातील संत्री बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका देशात निर्यात होतात. यंदा दीड लाख टन संत्री बांगलादेशात निर्यात होण्याची अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून संत्र्याची निर्यात करण्यात येते.