दिनेश केसकर : सहा महिन्यांत भारतीय प्रवाशांमध्ये २१ टक्के वाढनागपूर : उपराजधानीत ‘बोर्इंग’ने तयार केलेल्या जागतिक पातळीवरील ‘एमआरओ’चे करारानुसारच ‘एअर इंडिया’ला हस्तांतरण करण्यात आले आहे. या ‘एमआरओ’ मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. परंतु नागपुरात येण्यासाठी जागतिक पातळीवरील सोडाच परंतु अगदी मुंबईतले लोकदेखील येण्यास तयार नसतात. त्यामुळे याचे दर्जेदार संचालन करणे हे ‘एअर इंडिया’समोर आव्हान राहणार आहे, असे मत ‘बोईंग इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर यांनी व्यक्त केले. ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’तर्फे हवाई क्षेत्रातील जागतिक स्थिती आणि बदलते चित्र या विषयावर व्याख्यानाचे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.केसकर बोलत होते.जागतिक स्तरावरील हवाई क्षेत्रात चढउतार होत असतात. परंतु एकूण प्रगती लक्षात घेता येत्या २० वर्षात जगभरात ३८ हजार ५० नवीन विमानांची गरज लागणार आहे. यातील १४ हजार ३३० विमानांची सर्वात जास्त मागणी आशिया खंडातून राहणार आहे. त्या तुलनेत अमेरिका व युरोप मागे राहणार असल्याची माहिती डॉ.केसकर यांनी दिली. जागतिक पातळीवर चित्र लक्षात घेतले तर गेल्या वर्षभरात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली असून ९०० हून अधिक नवीन विमाने सेवेत आली आहेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला ‘फ्रेन्ड्स इंटरनॅशनल’चे अध्यक्ष सुरेश जुनघरे, संयोजक अनिल गणात्रा, सचिव डॉ.संजय मानेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. जुनघरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.मानेकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)नागपूरमध्ये ‘नेटवर्क’ वाढावेगेल्या काही वर्षांत नागपूरने हवाई क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला केवळ एकाच कंपनीकडून सेवा देण्यात येत होती. आता अनेक कंपन्यांची विमाने यायला लागली आहे. जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी नागपुरात हवाई सेवेचे ‘नेटवर्क’ वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारतीयांनी ‘मार्केटिंग’ कौशल्य वाढवावेदेशातील हवाई क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाचा ‘जीडीपी’ देखील वाढीस लागला असून या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांतच भारतात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हवाई क्षेत्रात वाढ झाली तर हॉटेल, पर्यटन इत्यादी क्षेत्रांचा विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. परंतु समोरील संधी आणि आव्हाने लक्षात घेता भारतीयांनी ‘मार्केटिंग’मधील कौशल्य वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
‘एमआरओ’चे दर्जेदार संचालन हे आव्हानच
By admin | Published: October 19, 2015 3:11 AM