नागपूर : प्रवाशांना स्वच्छ वातावरण आणि पोष्टीक खाद्य पदार्थ उपलब्ध करून देत रेल्वेच्या नागपूर विभागातील आमला रेल्वे स्थानकाने प्रतिष्ठेचे 'ईट राईट स्टेशन' प्रमाणपत्र मिळवले आहे. मध्य प्रदेशातील महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून बैतूलचा उल्लेख होतो.
वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना खान-पानाची सेवा कशी दिली जाते. सेवा देणारे अधिकृत की अनधिकृत त्याची रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी आकस्मिक तपासणी घेतली जाते. आमला रेल्वे स्थानकावरही ती करण्यात आली. प्रवाशांना कसे खाद्य पदार्थ उपलब्ध करून दिले जातात, त्यांचा दर्जा, खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या पाण्याचा वापर केला जातो तसेच पदार्थ बनविणारे कर्मचारी आणि किचन मधील वातावरण या सर्वांचे ऑडिट खाद्य सुरक्षा प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानुसार, गुणवत्तेचे उच्च मानकांनुसार आमला स्थानकावर खाद्य पदार्थ बनविले जातात आणि ते प्रवाशांना उपलब्ध करून दिले जातात, असे निदर्शनास आले. हेच नव्हे तर खाद्य पदार्थांची विक्री करणारे स्टॉलधारकही परवानाप्राप्तच असल्याचे उघड झाल्यामुळे आमला रेल्वे स्थानकास प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र नुकतेच रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
कचऱ्याचीही योग्य विल्हेवाटआमला स्थानकावर दर्जेदार खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री करतानाच या प्रक्रियेतील सर्व मंडळी ओल्या, सुक्या कचऱ्याची विल्हेवाटही योग्य पद्धतीने लावतात. मुंग्या-माकोड्यांसारखे किटक आजुबाजुला राहू नये, याचीही काळजी तेथे घेतली जाते. त्याचमुळे आमला रेल्वेस्थानकाला हे मानाचे प्रमाणपत्र मिळाल्याचे रेल्वे अधिकारी सांगत आहेत.