अंदाजपत्रकीय आराखड्यानुसार कामेच नाहीत : जिल्ह्यात ६० कोटीची कामे होणार
नागपूर : विकासाच्या योजनांवर नियंत्रणाचा अभाव असल्याने, त्याची कशी वाट लागते, याची प्रचिती केंद्र सरकारच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुअर्बन योजनेत झालेल्या कामांवरून दिसून येते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, अंदाजपत्रकीय आराखड्यानुसार कामेच झाली नसल्याच्या तक्रारी गावा-गावातून येत आहे. या योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातून हिंगणा व कामठी तालुक्याची निवड करण्यात आली आहे.
कामठी तालुक्यातील भूगाव सर्कल व हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा सर्कलची या योजनेसाठी निवड झाली आहे. सर्कलमध्ये २५ किलोमीटरच्या आत येणाऱ्या गावांचा विकास योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. योजनेतून बचत गटांसाठी दुकाने, शेतकऱ्यांसाठी गोदाम तसेच ग्राम विकासाची १६ योजनांची कामे करण्यात येणार आहे़त. हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा सर्कलमध्ये सुरू असलेल्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाला आहे़. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात येत आहे. याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला मिळाल्या आहेत. १४ जानेवारी २०१६ च्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार १६ बाबींवर कामे करण्याचे प्रस्तावित आहे़. राज्यातील सात जिल्ह्यांत ही कामे प्राधान्याने सुरू आहे़त. नागपूर जिल्ह्यात जवळपास ६० कोटींची कामे होणार आहे़त. आतापर्यंत २० कोटींची कामे प्रगतीपथावर आहे़त. हिंगणा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीत हे काम सुरू आहेत. ज्या कामांत प्रचंड घोळ आहे़ गोदामाच्या दोन खोल्यांची किंमत १२ लाख रुपये आहे़. तसेच बचत गटांसाठी सहा दुकाने बांधण्याचे धोरण आहे़ त्यावर ३० लाखांची तरतूद आहे़. मात्र, कामाचा दर्जा बघितल्यास, हे काम अर्ध्याही किमतीचे नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे़. गांधी खापरी येथे आरोपानंतर निर्माणाधिन बांधकाम पाडण्यात आले़. कमी-अधिक सर्वच गावांत हा घोळ सुरू आहे़. स्थानिक सरपंचच ठेकेदार झाल्याने, अशा गैरप्रकाराने डोके वर काढल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत़
- ही योजना माझ्या सर्कलमधील गावांमध्ये राबविण्यात येत आहे. सरपंचाकडून निकृष्ट बांधकामाच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी आहे.
- उज्वला बोढारे, सभापती, महिला व बालकल्याण
- हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत भवन, गोडावून, दुकानांच्या कामात गैरव्यवहाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ अधिनस्थ यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले असून बांधकामस्थळी भेट देऊन निरीक्षणे नोंदविण्यात येत आहे़त. चौकशीअंती दोषींवर कठोर कार्यवाही प्रस्तावित करण्याचे बांधकाम विभागाला बजाविले आहे़.
- मनोहर कुंभारे, उपाध्यक्ष