लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनावरांपासून कोरोना संसर्ग होण्याचा कोणताही धोका नाही, असा निर्वाळा पशुतज्ज्ञांनी दिला आहे. असे असताना कोरोना विषाणूंच्या प्रसारामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा येथील एका कुटुंबाकडे असलेली गाभण गाय क्वारंटाईन करण्यासाठी मनपातील अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू होता. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास मनपाचे अधिकारी या गाईला क्वारंटाईन करण्यासाठी पोहचले. पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर चर्चा केल्यामुळे गाईवर आलेला क्वारंटाईन होण्याचा प्रसंग टळला.सतरंजीपुरा परिसरातील एकाच कुटुंबातील २६ सदस्य क्वारंटाईन केंद्रात गेले. घरी गाभण गाय असल्याने एक सदस्य देखभाल करण्यासाठी घरी थांबला. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असल्याने आता संसर्गाचा धोका नसताना गाईला क्वारंटाईन करण्यासाठी खटाटोप कशासाठी, असा प्रश्न पडला आहे. तसेही जनावरांना क्वारंटाईन करावयाचेच झाले तर मनपाने तशी व्यवस्थाही केलेली नाही. दुभती जनावरे वाऱ्यावर सोडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.लोकांच्या अडचणी वाढल्याकोरोना विषाणूच्या प्रसारामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील १८०० लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याने बहुसंख्य परिसर खाली झाला आहे. काही मोजके नागरिक व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने क्वारंटाईन केंद्रातून परतलेले वास्तव्यास आहेत. या लोकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडता येत नाही. किराणा दुकाने बंद असून दूधही मिळत नाही. यामुळे अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आल्याने अडचणी वाढल्या आहेत.क्वारंटाईन केंद्रापेक्षा घरी सुरक्षितकोरोना संसर्ग टाळण्यासाठी घरातील २६ सदस्यांना क्वारंटाईन केंद्रात पाठविले. परंतु तेथे सामूहिक शौचालय व बाथरूमचा वापर करावा लागतो. यात एखादा बाधित असला तर इतरांना बाधा होण्याचा धोका अधिक आहे. त्यापेक्षा लोकांना घरातच क्वारंटाईन केले तर अधिक सुरक्षित राहील, असे मत सतरंजीपुरा येथील रशीद खान यांनी व्यक्त केले.