लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास संसर्ग रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जाते. लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. क्वारंटाईन करण्याला नागरिकांचा विरोध नाही. पण यासंदर्भात संबंधितांना मनपाच्या आरोग्य विभागाने पूर्वसूचना व पत्र तर द्यावे, अशी भूमिका सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांनी घेतल्याने मनपाच्या आरोग्य पथकाला दोन दिवस माघारी परतावे लागले.मोमिनपुरा व सतरंजीपुरा परिसरात सर्वाधित बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातील जवळपास अडीच हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात सतरंजीपुरा भागातील १७०० लोकांचा समावेश आहे. यातील निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना सुटी दिल्यानंतर पुन्हा नवीन लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. मात्र क्वारंटाईन केंद्रावर ४० ते ५० लोकांना ४ ते ५ शौचालयांचा वापर करावा लागतो. यात एखादी व्यक्ती बाधित असल्यास इतरांना बाधा होण्याचा धोका आहे. तसेच जेवणाची सुविधा चांगली नाही, अशा येथून परतलेल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. व्यवस्थेविषयी तक्रारी असल्याने क्वारंटाईन करा, पण आम्हाला मनपा प्रशासनाकडून पत्र द्यावे, अशी भूमिका लोकांनी घेतली.शनिवारी व रविवारी मनपाच्या पथकाने लोकांना क्वारंटाईन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्राची मागणी केल्याने पथक माघारी परतले. या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सवाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.बसचे निर्जंतुकीकरण नाहीक्वारंटाईन करताना लोकांना एकाच बसमधून नेले जाते. यात एखादा बाधित रुग्ण असल्यास इतरांना बाधा होण्याचा धोका असतो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसचे निर्जंतुकीकरण वारंवार करणे आवश्यक आहे. परंतु निर्जंतुकीकरण केले जात नसल्याची लोकांची तक्रार आहे.लोकांना अडचणीत टाकण्याचा प्रकारसतरंजीपुरा परिसरातील सर्वाधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. येथील नागरिकांनी यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. असे असताना आता पुन्हा तीन आठवड्यांनंतर रोडच्या पलीकडील आरामशीन व बेकरी लगतच्या परिसरातील लोकांना क्वारंटाईन कशासाठी केले जात आहे. आमचा याला विरोध नाही. परंतु आरोग्य विभागाने तसे पत्र द्यावे. दुसरीकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये सामूहिक शौचालयाचा वापर करावा लागतो. इतरही व्यवस्था चांगली नसताना घरी सुरक्षित असलेल्या लोकांना अडचणीत टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नगरसेवक नितीन साठवणे यांनी केला आहे.
क्वारंटाईन करा, पण साधे पत्र तर द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 8:45 PM