नागपूर : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आल्याने संकट आणखी वाढले आहे. नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जात आहेत. नागपूर जिल्ह्यात युरोप, मिडल ईस्ट, साऊथ आफ्रिका येथून आलेल्या प्रवाशांसाठी १४ दिवस अनिवार्य क्वारंटाईन आहे. मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सात दिवसात संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाईन) सुटका होणार आहे. मात्र पुढील सात दिवस त्यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्याने खबरदारीचे उपाय केले जात आहेत. त्यानुसार बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार खासगी हॉटेल किंवा शासकीय व्हीएनआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाईल. येथे आल्यापासून पाच ते सात दिवसाच्या कालावधीत कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. या चाचणीत ते निगेटिव्ह आल्यास व लक्षणे नसल्यास त्यांना सात दिवसाच्या संस्थात्मक विलगीकरणानंतर सुटका होईल. पण या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईन राहणे अनिवार्य असणार आहे. परंतु चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास मेडिकलच्या विशेष वॉर्डात ठेवले जाईल. सध्या दोन प्रवासी खासगी हॉटेलमध्ये तर तीन प्रवासी व्हीएनआयटी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. या संदर्भातील अधिक माहितीसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त व कोरोनाचे नोडल अधिकारी संजय निपाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल फोन बंद होता.
-मेडिकलच्या ४९ वॉर्डाला विशेष वॉर्डाचे स्वरूप
मेडिकलच्या मुख्य इमारतीपासून दूर असलेल्या मेडिसीनचा वॉर्ड क्र. ४९ ला विशेष वॉर्डाचे स्वरूप दिले जात आहे. येत्या काही दिवसात किरकोळ बांधकाम पूर्ण होऊन हा वॉर्ड रुग्णसेवेत असणार आहे. सध्या विदेशातून नागपुरात परतलेले व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना मेडिकलच्या पेईंग वॉर्डात ठेवण्यात आले आहे.