गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे सांैदर्यीकरण प्रकल्पाला जपान सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १२५२.३३ कोटी रुपये आहे. नदी पात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, झोपडपट्ट्या, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. नदीकाठावरील २९ झोपडपट्ट्यात ९७१८ घरे असून येथील लोकसंख्या ५५२१० इतकी असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.यातील २२ झोपडपट्ट्या १९७१ ते १९९२ सालात वसलेल्या आहेत. कायद्याने या झोपडपट्ट्यांना संरक्षण प्राप्त आहे. सात झोपडपट्ट्या १९९२ सालानंतर वसलेल्या आहेत. त्यामुळे या झोपडपट्ट्या हटविण्यापूर्वी येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. नदी किनाऱ्यावरील सार्वजनिक वापराच्या जागा, क्रीडांगण व निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या जागावर या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. तसेच नदीकाठावर मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारती आहेत. सौंदर्यीकरणाचा आराखडा निश्चित झाल्यानंतर नेमक्या किती इमारती व झोपडपट्ट्या बाधित होणार हे स्पष्ट होईल. परंतु झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याची माहिती महापालिके च्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नामुळे नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पाला गती मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.मनपाचा वाटा १८७.८४ कोटींचाया प्रकल्पांतर्गत नागनदीसोबतच पिवळी नदी आणि बोर नाला शुद्धीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८५ टक्के कर्ज १०६४.४८ कोटी रुपये जपान सरकार उपलब्ध करून देणार आहे तर प्रकल्पाच्या १५ टक्के निधीसाठी १८७.८४ कोटी रुपये इतकी रक्कम महापालिका गुंतवणार आहे. परंतु आर्थिक परिस्थिती विचारात घेता महापालिकेला हा वाटा उचलताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
२४ सप्टेंबरच्या सभेत प्रस्तावमहापालिकेने नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या क लम ३७ अंतर्गत या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव २४ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणला जाणार आहे.
१६.७३ किलोमीटर पात्राचे सौंदर्यीकरणनागपूर शहराच्या मंजूर विकास प्रारूपानुसार मौजा अंबाझरी ते पुनापूर संगमापर्यंत पश्चिम ते पूर्व नागपुरातून नागनदी वाहते. शहरातील नागनदीची लांबी १६.७३२ किलोमीटर आहे. ही नदी नागपूर शहरातील मौजा अंबाझरी, लेंड्रा, धंतोली, जाटतरोडी, हिवरी, वाठोडा, पारडी, भरतवाडा, पुनापूर भागातून वाहते. सद्यस्थितीत नदीच्या पात्रालगत मोठया प्रमाणात झोपडपट्ट्या, बहुमजली इमारती, दुकाने व धार्मिक स्थळे उभारण्यात आलेली आहेत.