नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीव्हीआयपीच्या ताफ्यातील वाहनांना झालेल्या लागोपाठ अपघातांमुळे राज्यातील सर्वच नेत्यांसह, सुरक्षा यंत्रणांनाही जबर हादरा बसला आहे. या अपघातानंतरच्या प्राथमिक चौकशीत पुढे आलेली भीषणता आणि कारणमीमांसा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारी ठरली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा सर्वत्र उडत आहे. त्यामुळे राज्यभर व्हीव्हीआयपी मुव्हमेंट वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आलेल्या अपघाताच्या विषयाने राजकीय वर्तुळात धडधड वाढली आहे.माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर चंद्रपूरहून गुरुवारी, २६ सप्टेंबरला सकाळी नागपूरकडे येत असताना त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळले. त्यामुळे वाहनचालक पोलीस कर्मचारी विनोद विठ्ठलराव झाडे (वय ३७, रा. चंद्रपूर) आणि सीआरपीएफचे जवान फलजीभाई पटेल यांचा मृत्यू झाला. तर, पाच सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाले.या अपघाताची चर्चा सुरू असतानाच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल रविवारी २९ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोंदियावरून नागपूरकडे येत असताना महालगाव कापसीजवळ त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांचे वाहन एका टिप्परवर धडकले अन् त्यात गजानन गिरी नामक एका पोलीस उपनिरीक्षकाला गंभीर, तर तिघांना जबर जखमा झाल्या. या अपघातांनंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीनंतर जे वास्तव पुढे आले ते व्हीव्हीआयपींची सुरक्षा करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्यांचाच नव्हे तर नेत्यांचीही धडधड वाढवणारे ठरले आहे.व्हीव्हीआयपी / मंत्र्यांच्या सेवेत वेगाशी स्पर्धा करणारी अत्याधुुनिक वाहने असतात. तर, सुरक्षा रक्षकांची वाहने खटारा, टायर घासलेली असतात. याच वाहनातून सुरक्षा रक्षक स्वत:च्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून अत्याधुनिक वाहनांशी स्पर्धा करतात.ही जीवघेणी विसंगती विदर्भातील दोन अपघाताच्या प्राथमिक चौकशीतून अधोरेखित झाली आहे. याशिवाय अप्रशिक्षित वाहनचालक, सुरक्षा रक्षकांकडून सलग घेतली जाणारी सेवाही या अपघाताला कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे.व्हीव्हीआयपींकडे असलेली अत्याधुनिक वाहने १०० / १४० किलोमीटर प्रति तास वेगाच्या मर्यादेने धावतात.
आरामशीर सुविधांमुळे या वाहनात बसलेल्यांना धक्काही लागत नाही.मात्र, या वाहनांसोबत स्पर्धा करणाऱ्या, सुरक्षा रक्षक बसलेल्या वाहनांची अवस्था फारच वाईट असते. अनेक वाहनांचे टायर घासलेले असतात. तशाही अवस्थेत जीव धोक्यात घालून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने ती वाहने चालविली जातात. त्यात क्षणाचा अडसर किंवा दुर्लक्ष झाले की अपघात होऊन त्यात निरपराधाचा बळी जातो.अहिर आणि पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाचे असेच अपघात घडले आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शिजवळ सोमवारी राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनचालकाने बेदरकारपणा दाखविल्यामुळे एका निरपराध तरुणाचा बळी गेला.
चुकीचे नियोजन अन् वेगाशी स्पर्धाया अपघातांना आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, संबंधितांकडून वेळेचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे मंत्र्यांसोबत सुरक्षा रक्षकांनाही वेगाशी स्पर्धा करावी लागते. मंत्री महोदयांना एकाच दिवशी दूर अंतरावर अनेक कार्यक्रम असतात. पहिला कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि तो थोडासा लांबला की दुसऱ्या गावच्या कार्यक्रमाला विलंब होतो. त्यामुळे तिकडे पोहचण्यासाठी वेगाने चलण्याचा आग्रह असतो. या वेगाला मंत्री महोदयाचेही प्रोत्साहन असते. दुसरे म्हणजे, दौऱ्याचे नियोजन करणारी मंडळी (पीए) नागपूर - चंद्रपूर प्रवास तीन-साडेतीन तासांचा असेल तर ते दोन अडीच तासातच पोहचू शकतो, असे गृहित धरतात. सारखी सारखी दगदग अन् वाहन चालविताना चालकाला करावी लागणारी वेगाशी स्पर्धा, लक्षातच घेतली जात नाही.
डीआयजींचा नो रिस्पॉन्सदिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, मोरारजी देसाई पासून तो माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्याची सुरक्षा व्यवस्था करणारे निवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश मेहता यांनी नेत्यांनी तसेच पायलटने सुरक्षा पथकातील समोरच्या वाहन प्रमुखाने वेगाचे भान राखल्यास असे अपघात घडणार नाही, असे म्हटले आहे. आवर घालण्याची जबाबदारी त्यांनीच स्वीकारावी, अशी सूचनाही मेहता यांनी केली.एसपीयू (विशेष सुरक्षा पथक)चे उपमहानिरीक्षक (डीआयजी) सत्यनारायण चौधरी यांचे कार्यालय मुंबईत आहे. त्यांच्याशी या अपघातासंबंधाने लोकमतने चर्चा करण्याचे प्रयत्न केले. पहिल्या वेळी त्यांनी मिटिंगमध्ये आहो, थोड्या वेळेनंतर बोलतो, असे म्हटले. नंतर मात्र त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.