नागपूर : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच अपॉईंट केले आहे. ते मागील सरकारचे ‘कंटिन्यू’ झालेले ॲडव्होकेट जनरल नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात त्यांना नियुक्त केले आहे. त्यामुळे कुंभकोणी यांच्या संदर्भातला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला.
मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्य सरकारला थकीत वीज बिलाची सावकारासारखी बळजबरीने वसुली करायची आहे. म्हणून सरकारकडून थकबाकीचा बाऊ निर्माण केला जात आहे. कोरोनामुळे एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याकडून वसुली करण्याच्या बेतात आहे. त्यासाठी हे सर्व नाटक सुरू आहे.
ऊर्जामंत्र्यांनी जे प्रेझेन्टेशन केले, त्यातून स्पष्ट होते की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, प्रवीण दरेकर बोलीभाषेत असे बोलले आहेत. त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढणे योग्य नाही. सध्या राष्ट्रवादीकडे कुठले मुद्दे नाहीत. त्यामुळे ते असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
निवडणुकांना सामोरे जाऊ
- ओबीसी आरक्षणाविना जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्याला सामोरे जाऊ. मात्र सरकार जे बोलते ते कृतीत दिसत नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे.