नागपूर : स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंकेमधून काढण्यात येणाऱ्या ठेवींच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केवळ २३ वर्षांच्या तरुणाची नियुक्ती झाली आहे. केवळ गुणवंत सदावर्ते यांचा नातेवाईक असल्याने ही नियुक्ती झाली असून अनुभव नसलेल्या व्यक्तीला महत्त्वाच्या पदावर कसे काय बसवले असा सवाल आ.अनिल परब यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात परब यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंकेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र नवीन संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने कारभा सुरू केला आहे. सदावर्ते व त्यांच्या पत्नी या बॅंकेच्या तांत्रिक मंडळावर आहेत. ते वकील असून त्यांनी असे कोणते निकष पूर्ण केले की तांत्रिक मंडळावर पोहोचले असा सवाल परब यांनी उपस्थित केला. जी बॅंक नफ्यात होती, त्याचे व्याजदर संचालक मंडळाने बदलले व त्यामुळे १८० कोटींच्या ठेवी काढण्यात आल्या आहेत. बॅंकेचा क्रेडीट डिपॉझिट रेशिओ हा कर्ज व ठेवींच्या प्रमाणात ७० टक्के असावा लागतो. मात्र तो ९५.१२ टक्के इतका झाला आहे. संचालक मंडळाला बरखास्त करण्याचा अधिकार रिझर्व्ह बॅंकेकडे आहे. सहकार आयुक्त याकडे लक्ष ठेवून आहेत. पुढील दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
१४ संचालक निर्णयाविरोधात
व्याजदरात बदल करण्याच्या निर्णयामुळे बॅंकेची स्थिती डबघाईस येण्याचा धोका निर्माण झाला आहे. बॅंकेचे १८ पैकी १४ संचालक या निर्णयाविरोधात आहेत. त्यांनी या कारभाराला विरोध केला आहे, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.