नागपूर :जिल्हा परिषद आणि त्यांची कामे करणारे ठेकेदार यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा नव्या नाहीत. कामे मिळवण्यासाठी ठेकेदार कोणकोणते मार्ग अवलंबतात, याचीही आता बऱ्यापैकी सर्वसामान्यांना जाण आहे. मात्र अनेक जिल्हा परिषद सदस्यच ठेकेदार बनून दुसऱ्यांच्या नावाने कामे मिळवून करत असतील, तर त्या कामांचा दर्जा काय असेल? कामाचा दर्जा निकृष्ट असेल, तर त्यांना विचारणार कोण, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा परिषद करत असते. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम, गटारे, दिवाबत्ती, समाज मंदिर बांधणे आदी कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. या कामांसाठी निविदा काढून कंत्राटदार नेमले जातात. परंतु, अलीकडील काळात जिल्हा परिषद सदस्य दुसऱ्याच्या वा पत्नीच्या नावाने कंत्राट घेवून कामे करीत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद सदस्य बनून ग्रामीण भागाचा विकास करण्यापेक्षा स्वहीत कसे जपले जाईल, याकडेच अशा सदस्यांचा कल असल्याचे उघड सत्य आहेत.