गणेश टेकडी मंदिर व जनआक्रोशतर्फे स्वाक्षरी अभियान सुरूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्टेशनसमोरचा उड्डाणपूल अनावश्यक असल्याच्या तक्रारी अनेक संघटनांकडून होत आहेत. मानस चौक व जयस्तंभ चौकाला जोडणारा हा पूल दोन्ही चौकात वाहतुकीची कोंडी करणारा ठरला असून, गणेश टेकडी मंदिरात जाणाऱ्या भाविकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे हा फ्लायओव्हर पाडण्यात यावा, या मागणीसाठी अॅडव्हायजरी सोसायटी आॅफ गणेश टेम्पल व जनआक्रोश संघटनेने सोमवारपासून स्वाक्षरी अभियान सुरू केले. जनआक्रोशचे रवींद्र कासखेडीकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत याविषयी माहिती दिली. दहा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या उड्डाणपुलाला त्यावेळीही विरोध झाला होता. मात्र प्रशासनाने विचाराअभावी याचे बांधकाम केले. या पुलामुळे रेल्वे स्टेशन आणि टेकडी मंदिरात जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. मानस चौकासह मेयो रुग्णालयाकडून व एलआयसी, आरबीआयकडून येणारी वाहने जयस्तंभ चौकात धडकतात. त्यामुळे या चौकात दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते. नागरिकांना दररोज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो. वन-वे असल्याने मंदिरात जाणाऱ्या भाविकांसह स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांनाही वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय या पुलामुळे ऐतिहासिक जयस्तंभ चौकाचीही दुर्दशा झालेली आहे. वाहतुकीच्या अडचणीवर मात करण्यासाठी फ्लायओव्हर बांधण्यात येतो. मात्र दुर्दैवाने या पुलामुळे सोय होण्याऐवजी अडचणीच अधिक निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रयोजन नसताना अविचारीपणे या पुलाचे बांधकाम केल्याची टीका कासखेडीकर यांनी केली. या अनेक समस्या पाहता हा पूल त्वरित पाडण्यात यावा, यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. टेकडी मंदिर सोसायटीचे अध्यक्ष पुंडलिकराव जवंजाळ यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली. मोहिमेंतर्गत एक लक्ष लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारला निवेदन सोपविणार असल्याचे कासखेडीकर यांनी सांगितले. यासाठी रेल्वे विभागासह विविध ठिकाणी हे अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.न्यायालयानेही व्यक्त केली होती नाराजी२०१० ला एका जनहित याचिकेंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या पुलाच्या बांधकामाविषयी ताशेरे ओढले होते. पुलाखाली तयार केलेले १८० गाळे व्यावसायिकांना वितरित करण्यात आले. यामध्ये गॅस सिलिंडरचा सर्रासपणे वापर होतो. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी न्यायालयाने महापालिकेसह नासुप्र, पोलीस विभाग, जिल्हाधिकारी तसेच रेल्वे विभागालाही नोटीस बजावली होती. त्यानंतरही पुलासंदर्भात निर्णय होत नसल्याने ही न्यायालयाच्या आदेशाची अवमानना असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेत गणेश मंदिर सोसायटीचे श्रीराम कुळकर्णी, संगम दडवी, प्रकाश कुंटे, विकास लिमये, संजय जोगळेकर आदी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन उड्डाणपूल त्वरित पाडा
By admin | Published: May 23, 2017 2:01 AM