लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुदत संपलेला शिकाऊ परवाना, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पासिंगसह इतर कामांसाठी ३० सप्टेंबर २०२१पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तिन्ही आरटीओ कार्यालयांतील ऑनलाईन अपाॅईंटमेंट कोटा फुल्ल झाल्याने अनेकांना परवाना बाद होण्याची भीती सतावत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा - १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. यात ३० जून २०२१पर्यंत आणि नंतर ३० सप्टेंबर २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, नागपूर शहर व नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पूर्व नागपुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ज्या उमेदवारांना मुदतवाढ मिळाली, त्यांना सप्टेंबर महिन्यात ऑनलाईन अपाॅईंटमेंट मिळत नसल्याने त्यांच्या कार्यालयात चकरा वाढल्या आहेत. त्यामुळे कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.
- काय आहेत अडचणी?
ज्या उमेदवारांच्या शिकाऊ परवान्याची सहा महिन्यांची मुदत संपली आहे आणि त्यांना मुदतवाढीचा फायदा झाला आहे, त्यांच्यासाठी पक्का वाहन परवाना काढण्यासाठी ३१ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. परंतु, आता कोटा फुल्ल झाल्याने त्यांचा शिकाऊ परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुन्हा शिकाऊ परवाना काढण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.
- तारीख मिळालेले येत नाहीत, येणाऱ्यांना तारीख मिळत नाही
आरटीओ कार्यालयातील एका सहाय्यक वाहन निरीक्षकाने सांगितले, सप्टेंबर महिन्यातील कोटा फुल्ल झाला आहे. ज्यांना तारीख मिळाली आहे ते येत नाहीत आणि येणाऱ्यांना तारीख मिळत नसल्याचे चित्र आहे.
- रोजचा १६०चा कोटा
पक्क्या परवान्यासाठी शहर आरटीओ कार्यालयात रोज १६०चा कोटा आहे. परंतु, सप्टेंबरपर्यंत हा कोटा फुल्ल झाला आहे. परवाना रद्द होऊ नये, म्हणून शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.
- आढावा घेऊन कोटा वाढविण्यावर निर्णय घेणार
३१ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ असणाऱ्यांसाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. परंतु, त्यानंतरही काहींना जर अपाॅईंटमेन्ट मिळत नसेल तर आढावा घेऊन कोटा वाढविण्यावर निर्णय घेण्यात येईल.
- खंडेराव देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर