योगेश पांडे
नागपूर : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला गुजरातमधील कर्णावती येथे सुरुवात होणार आहे. मागील काही काळात देशभरात हिजाब, लव्ह-जिहाद आदी मुद्द्यांवर वादंग झाले असताना संघातर्फे प्रतिनिधी सभेत या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र २०२५ मध्ये संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ५५ हजार स्थानांपासून देशभरात एक लाख ठिकाणी संघाच्या विस्तारावर मंथन करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. ही संघाच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मोठी समिती असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्य अहवाल मांडतात. तसेच पुढील उपक्रमांची रूपरेषादेखील निश्चित करण्यात येते. २०२० मध्ये कोरोनामुळे सभा रद्द झाली होती तर मागील वर्षी बंगळुरूत ४०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. यंदा संघ व संघाशी निगडित ३८ संघटनांतील १ हजार २४८ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तीन वर्षांअगोदरच संघाने शतक महोत्सवी वर्षापर्यंत विस्ताराचे नियोजन केले होते. मात्र, कोरोनामुळे नियोजनाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवर राबवायच्या सेवाकार्य उपक्रमांची यात चर्चा होणार आहे. तीन दिवसीय चालणाऱ्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, प्रांत प्रचार, विभाग प्रचारक यांच्यासह विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्री उपस्थित राहतील.
स्वयंरोजगार, ग्रामविकासाबाबत प्रस्ताव येण्याची शक्यता
संघाच्या प्रतिनिधी सभेत दरवर्षी समाजातील विविध विषयांवर प्रस्ताव मांडण्यात येतात. यंदा देशातील ग्रामीण भागातील रोजगारवाढ, स्वयंरोजगार व ग्रामविकासाबाबत प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे. सोबतच समान नागरी कायद्याबाबत ठराव मांडण्यात येतो का, याकडे सामाजिक वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
या विषयांवरदेखील होणार चर्चा
- सामाजिक समरसता
- कुटुंब प्रबोधन
- शिक्षण धोरण
- पर्यावरण संवर्धन
- आर्थिक विकास
- सीमा व अंतर्गत सुरक्षा
- शहरी नक्षलवाद