प्रातिनिधीक फोटो
नागपूर : मोठमोठ्या ब्रँड्सच्या नावाखाली बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या नागपुरातील रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. संबंधित रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या विक्रेत्यांनी आतापर्यंत हजारो ग्राहकांची फसवणूक केली आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यांच्याकडून हजारो बनावट घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे घड्याळ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अगदी ब्रँडेड शोरूम्समधील मालाचीदेखील परत चाचपणी करण्यात येत आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात बऱ्याच दुकानांमध्ये टायटन, फास्टट्रॅक, सोनाटा या ब्रँडची बनावट घड्याळे विकण्यात येत होती. यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडूनदेखील चाचपणी होती. यासंदर्भात ठोस माहिती मिळताच पोलिसांना याची सूचना देण्यात आली. त्यानंतर तहसील पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत छापे टाकण्याचे नियोजन केले.
दोन दिवसांअगोदर नागपुरात यासंदर्भात कारवाई झाली. पोलिसांनी जरीपटका व इतवारीतील टांगा स्टँड परिसरातील दुकानांवर छापा टाकत सुमारे हजार बनावट घड्याळे, २ हजारांहून अधिक बनावट ‘डायल्स’ जप्त केली. इतवारीतील शक्ती वॉच, बाबा वॉच कंपनी, वंश ऑप्टिकल या दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. तेथून जवळपास १० लाखांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी राहुल मेघराज हरीरामानी, तिलकराज आहुजा व विश्वास प्रकाश जैन या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
१०० रुपयांत बनावट ‘डायल’
संबंधित रॅकेटमध्ये देशातील विविध भागांतून ब्रॅंडेड कंपन्यांच्या नावाने बनावट घड्याळ मागविण्यात येत होते. त्याचप्रमाणे हुबेहूब ओरिजिनल घड्याळाप्रमाणे दिसणारे बनावट ‘डायल्स’ तयार करून ते बोलविण्यात येत होते. त्यांची नागपूर व विदर्भात विक्री सुरू होती. प्रत्येक डायल शंभर ते दीडशे रुपयात विकले जात होते. त्यासाठी अगदी एजंट्सदेखील नेमण्यात आले होते. इतवारीतील टांगास्टँड परिसरात घड्याळ विकत घेण्यासाठी नेहमीच गर्दी असते. याचाच फायदा घेत ग्राहकांची फसवणूक सुरू होती.
बनावट गॉगल्स व वॉलेट्सचीदेखील विक्री
संबंधित ब्रॅंड्सच्या नावाखाली तीनही दुकानांमधून बनावट गॉगल्स व वॉलेट्सचीदेखील विक्री सुरू होती. याची पोलिसांना कुठलीही कल्पना नव्हती. ही बाब छापा टाकल्यावर समोर आली. पोलिसांनी २ लाख ७० हजार रुपयांचे जवळपास हजार गॉगल्स तसेच वॉलेट्स जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशी मिळाली टिप
ब्रान्डेड कंपन्यांकडून त्यांच्या मालाची नक्कल करून बनावट विक्री कुठे सुरू आहे याची तपासणी करण्यासाठी एजन्सी नेमण्यात येते. नवी दिल्लीतील गौतम तिवारी यांच्या एसएनजी सॉलिसिटर फर्मला कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या परीक्षकांना नागपूर हे ब्रँडेड नावाखाली बनावट घड्याळांची विक्री करणारे मोठे मार्केट असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याची चाचपणी केली असता माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तहसील पोलिस ठाण्यातील पथकाने पुढील कारवाई केली.