६० कार्यकर्त्यांना अटक व सुटका : आमदार व माजी नगराध्यक्षांमध्ये जुंपलीकाटोल : पायाभूत विकास कामांच्या भूमिपूजनावरून वाद उफाळून आल्याने काटोलमध्ये शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास खडाजंगी झाली. आ. डॉ. आशिष देशमुख व माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्या गटामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांची नंतर सुटका केली. या प्रकरणामुळे काटोलमध्ये सध्या शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे.विविध विकास कामांचे भूमिपूजन व जाहीर सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पंचवटी भागात हा कार्यक्रम होता. दरम्यान कार्यक्रमस्थळी निमंत्रण पत्रिकेतील नावावर आक्षेप घेत आ. देशमुख यांनी आयोजित केलेल्या भूमिपूजन कार्यक्रमात शेकापचे राहुल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. यामुळे दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाल्याने प्रकरण तापले. याबाबत काटोल पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शेकापच्या सुमारे ६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेत ठाण्यात नेले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, भूमिपूजनानंतर जाहीर सभा शांततेत पार पडली. काटोल नगरपालिका ही राज्यातील अव्वल दर्जाची म्हणून नावलौकिक आहे. पालिकेच्या सत्तेत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन नगराध्यक्ष राहुल देशमुख यांच्यासह एकूण आठ नगरसेवकांना राज्याच्या नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले आहे. याबाबत शेकापने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावर २९ मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे समजते. दरम्यान, काटोलमधील विकास कामांचा भूमिपूजनाचा सपाटा लावण्याचा डाव आखला होता. त्यानुसार शनिवारी काटोलमध्ये भूमिपूजन होते. भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आ. डॉ. आशिष देशमुख व राहुल देशमुख यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धाव घेतली. विकास कामाच्या भूमिपूजनावरुन आ. देशमुख व राहुल देशमुख यांच्या खडाजंगी झाली. वाद वाढतच गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलाविली. शेकापचे राहुल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. (प्रतिनिधी)
भूमिपूजनावरून काटोलमध्ये राडा
By admin | Published: March 27, 2016 2:59 AM