लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राखी पौर्णिमेच्या पर्वावर गंगाजमुना येथील वारांगनांचे समर्थक व विरोधक एकमेकांपुढे उभे झाले. यावेळी दोन्ही गटाच्या आंदोलकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी काैशल्याने स्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या तसेच गंगाजमुना बचाव समितीच्या प्रमुख ज्वाला धोटे गंगाजमुना येथील वारांगनांसोबत रक्षाबंधन साजरे करणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्याला विरोध करण्यासाठी ‘गंगा जमुना वेश्या व्यवसाय हटाव कृती समिती’ने रविवारी आंदोलन उभारले. त्याचे नेतृत्त्व राष्ट्रवादी पक्षाच्या महापालिकेतील नगरसेविका आभा पांडे यांनी केल्याने एकाच पक्षाच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमाेर उभ्या ठाकल्याचे चित्र अनेकांनी बघितले. धोटे आणि पांडेंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. वातावरण तापल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी मोठा पोलीस ताफा तसेच दंगा नियंत्रक पथकासह घटनास्थळी धाव घेऊन दोन्हीकडच्या मंडळींना समजविले. कायदा हातात घेतल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. त्यानंतर आक्रमक भाषा वापरणारी दोन्हीकडची मंडळी शांत झाली.
---
निर्णय घेतलाच कसा ?
दिवंगत जांबुवंतराव धोटे यांनी वारांगनाकडून राखी बांधून घेत अनेक वर्षांपूर्वी त्यांचे रक्षण करण्याची हमी दिली होती. ते लक्षात घेत पित्याचा वारसा पुढे चालवून वारांगनांना प्रस्थापित होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका आता दिवंगत जांबुवंतराव धोटे यांच्या कन्या ज्वाला यांनी घेतली आहे. पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी त्यांनी रक्षाबंधनाचा सण गंगाजमुनात साजरा करणार, असेही जाहीर केले होते. त्यानुसार, रविवारी सकाळी ज्वाला धोटे आपल्या कार्यकर्त्यांसह गंगाजमुनात दाखल झाल्या होत्या.
----
नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे काय ?
येथील वेश्या व्यवसाय आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच गुन्हेगारीचा सामना करावा लागतो. हा त्रास कोण आणि कधी संपविणार, असा सवाल करून नगरसेविका आभा पांडे यांच्या नेतृत्वात ‘गंगा जमुना वेश्या व्यवसाय हटाव कृती समिती’चे मनोज चाफले, विपीन जैन, रवी गुडपल्लीवार, पुष्पा वाघमारे, मधुकर फुकट, सिराज खान यांनी आंदोलन उभे केले आहे. ही मंडळी आज आक्रमक पवित्र्यात दिसत होती.
---
पोलिसांच्या खांद्यावर बिल्डरांची बंदूक ?
सुमारे दहा एकरांत पसरलेली आणि शेकडो कोटी किमतीची ही वस्ती इतवारी या घाऊक बाजाराला लागूनच असल्याने या बाजाराच्या विस्तारीकरणासाठी तिच्यावर अनेक बिल्डर्सचा डोळा असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांना समोर करून गंगाजमुना वस्ती हटवण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप होत आहे.
............