नदी-नाले तुडुंब भरले : कोंढाळी-काटोल मार्गावरील वाहतूक ठप्पनागपूर : मागील आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात जोर पकडला आहे. या पावसाने सध्या सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय लहान-मोठे जलाशयसुद्धा तुडुंब भरले आहे. उपराजधानीत रोज सुरू असलेल्या या पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहे.सोमवारी दिवसभर ऊन तापले. परंतु सायंकाळ होताच ६ वाजताच्या सुमारास चांगलाच धो-धो पाऊस कोसळला. या काहीच मिनिटाच्या पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवाय सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये पाणीसुद्धा शिरले. खामला चौकातील नेल्को सोसायटीमध्ये पाणी भरल्याने येथे तलावासारखे चित्र निर्माण झाले होते. नागरिकांना या पावसाचा चांगलाच फटका सहन करावा लागला. सोबतच जिल्ह्यात दुपारपासूनच धुवाँधार पावसाला सुरुवात झाली होती. या मुसळधार पावसामुळे कोंढाळी-काटोल मार्गावरील नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वरसह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे काटोल तालुक्यातील जाम नदी दुथडी भरून वाहात होती. यामुळे अरविंद इंडो पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व इतर नागरिक सुमारे तासभर अडकून पडले होते. तसेच कोंढाळीतील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्गावरील नाल्याचे पाणी थेट वडारपुरा भागातील काही घरात शिरले होते. सोमवारी दिवसभरात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकूण ४.९० मिमी पावसाची नोंद झाली असून, काटोल तालुक्यात १५ मिमी, नरखेड २१ मिमी, सावनेर १४ मिमी व कळमेश्वर ३० मिमी पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)दुचाकीवर वीज पडून तरुणाचा मृत्यूगोंडखैरी टोलनाका परिसरात एका तरुणाच्या दुचाकीवर वीज पडल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. विजय पूरणलाल सोनवाणे (वय २७) रा. इंदिरानगर, खडगाव रोड, टेकडी वाडी असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सायंकाळी ५.४५ वाजता घडली. माहिती सूत्रानुसार, तो चौदा मैल परिसरातील महिंद्रा कंपनीमध्ये काम करीत होता. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी आपल्या एमएच-४०/एबी-२९१५ क्रमांकाच्या दुचाकीने कंपनीकडे कामावर जाण्यास निघाला. त्याच वेळी त्याला वाटेत धो धो पावसाला सुरुवात झाली, तसेच विजेचा जोरदार कडकडाट होऊन ती थेट तरुणाच्या दुचाकीवर पडली. यावेळी तो दुचाकी चालवीत होता. मात्र वीज त्याच्या दुचाकीवर पडल्याने तो गंभीररीत्या भाजून त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, धावत्या दुचाकीवर वीज कोसळून तरुण जागीच ठार झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
मुसळधार ...
By admin | Published: July 26, 2016 2:17 AM