हरीश गुप्ता
नवी दिल्ली : बहुचर्चित रायबरेली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या ठिकाणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा हाेती. तर, भाजपने त्यांच्याविराेधात वरुण गांधी यांना उभे करून ही लढत गांधी विरुद्ध गांधी अशी करण्याची याेजना आखली हाेती. मात्र, वरुण यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. राहुल गांधी हे दुसऱ्या जागेवरुन उभे राहिल्यास ताे मतदारसंघ रायबरेली असेल. प्रियांका यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.
काय म्हणाले वरुण? यासंदर्भात ‘लाेकमत’ने वरुण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझी आणि पक्षनेतृत्वासाेबत झालेली चर्चा केवळ आमच्यापुरती मर्यादित आहे. ती सार्वजनिक करता येणार नाही. या जागेवर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष साेनिया गांधी निवडून गेल्या हाेत्या. त्या यावेळी लाेकसभेच्या रिंगणात नसल्यामुळे ही जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
अशी हाेती भाजपची याेजना...वरुण गांधी हे तीन वेळचे खासदार आहेत. मात्र, यावेळी त्यांना पिलीभीत येथून पक्षाने उमेदवारी दिली नाही. पिलीभीत येथून त्यांना तिकीट न देण्यामागे भाजपची रायबरेलीसाठी याेजना हाेती. उमा भारती, ब्रजेश पटेल, केशवप्रसाद माैर्या, नुपूर शर्मा इत्यादींबाबत रायबरेलीसाठी विचार झाला हाेता. मात्र, वरुण यांच्या नावावर शिक्कामाेर्तब करण्यात आले हाेते.
पत्र लिहून कळविला नकारवरुण गांधी यांनी नड्डा यांना पत्र लिहून प्रियांका किंवा राहुल गांधी यांच्याविराेधात निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.