राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : विविध विकास कामांतर्गत मनसर-रामटेक-तुमसर (जिल्हा) भंडारा या मार्गाच्या चाैपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले आहे. हा मार्ग जमिनीला समतल तयार करणे अपेक्षित असताना काही ठिकाणी चार तर काही भागात साडेचार ते पाच फूट उंच तयार केला आहे. त्यामुळे या मार्गालगतचा राखी तलाव येथील राेडलगतचा प्रवासी निवारा खाली गेला असून, राेड उंच झाल्याने शाबूत असलेला ताे प्रवासी निवारा निरुपयाेगी ठरत आहे. हा प्रकार लक्षात घेता ‘हा कसला विकास’ अशी प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्तींनी व्यक्त केल्या आहेत.
रामटेक हे पर्यटनस्थळ, तालुक्याचे ठिकाण, मुख्य बाजारपेठ आणि शैक्षणिक केंद्र असल्याने रामटेक शहर व परिसरात येणाऱ्यांची संख्याही बरीच माेठी आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मनसर-तुमसर मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम हाती घेत या कामाचे कंत्राट बारब्रिक नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. या मार्गावर असलेल्या प्रत्येक गावाला बसथांबा असून, काही गावांमध्ये यापूर्वीच प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले असून, ते आजही सुस्थितीत आहे. रामटेक शहरालगतच्या राखी तलावाजवळील बसथांबा हा त्यापैकी एक आहे.
पूर्वी हा बसथांबा राेडला समतल हाेता. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेला राेड या ठिकाणी किमान साडेतीन ते चार फूट उंच करण्यात आल्याने हा प्रवासी निवारा जमिनीत गेल्यागत झाला आहे. या निवाऱ्यातील प्रवाशाला राेडवर यायचे झाल्यास त्याला राेड चढावा लागताे. या ठिकाणाहून नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही बसने राेज प्रवास करतात. त्या सर्वांना या उंच राेडमुळे बसजवळ जाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. भविष्यात हा प्रकार निश्चितच धाेकादायक ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले आहे. अशीच अवस्था या राेडला जाेडणाऱ्या प्रत्येक जाेडरस्त्यांची आहे. दुसरीकडे ही समस्या साेडविण्यासाठी या ठिकाणी नव्याने उंच प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्याची मागणीही केली जात आहे.
...
पावसाळ्यात हाेणार गैरसाेय
हा राेड उंच असल्याने त्यावरील पावसाचे पाणी हे या प्रवासी निवारा परिसरात साचून राहणार आहे. मुसळधार व संततधार पाऊस बरसल्यास हा निवारा पाण्याचे भरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत प्रवासी व वाटसरूंना त्यात निवारा घेण्याची हिंमत हाेणार नाही. शिवाय, पाऊस सुरू असल्यास प्रवाशांना पावसात उभे राहून बस व इतर प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
...
अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड
या ठिकाणी प्रवाशांची साेय करावयाची झाल्यास प्रशासनाला सुस्थितीत असलेला हा प्रवासी निवारा आधी ताेडावा लागेल. त्यानंतर ती जागा मुरूम व माती टाकून उंच करावी लागेल. तसेच त्यावर नव्याने (राेडला समतल) प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया करावयाची झाल्यास निवारा ताेडणे, जागा उंच करणे व नव्याने बांधकाम करणे यासह अन्य बाबींसाठी प्रशासनाला विनाकारण खर्च करावा लागणार आहे.
...
अपघाताची शक्यता
हा निवारा खाली गेल्याने कुणीही तिथे बसून बस व वाहनांची प्रतीक्षा न करता राेडलगत उभे राहून प्रतीक्षा करतात. हा मार्ग वर्दळीचा असून, त्यावरून सतत जड वाहनांची भरधाव वाहतूक सुरू असते. बस किंवा प्रवासी वाहन पकडण्याच्या नादात प्रवासी घाईघाईने राेड ओलांडतील. त्यातून भविष्यात जीवघेणे अपघात हाेण्याची शक्यता बळावली आहे.