लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) वसतिगृह चार मधील एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीला प्राप्त झाली. याची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची एक-एक करून चौकशी केली. रॅगिंग झाले नसल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी तसे लेखी लिहूनही दिले. या निनावी तक्रारीमुळे मात्र महाविद्यालयात खळबळ उडाली.केंद्रीय रॅगिंग समितीला २०१८- १९ च्या शैक्षणिक सत्रातही मेडिकलमध्ये रॅगिंग झाल्याची एक तक्रार मिळाली होती. त्यात काही वरिष्ठ विद्यार्थ्यांचे नावही नमूद होते. परंतु अॅन्टी रॅगिंग समितीच्या चौकशीत एकही विद्यार्थी रॅगिंग झाल्याबाबत कबुली द्यायला तयार नव्हता. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावरही त्यांनी लेखी स्वरूपात रॅगिंग झाली नसल्याचे प्रशासनाला कळवले. हा अहवाल केंद्रीय समितीला पाठवल्यावर हे प्रकरण निवळले. त्यानंतर आता एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीकडे आली आहे. परंतु पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी नाकारले. याचा अहवाल लवकरच या समितीकडे सोपविला जाणार आहे. ही निनावी तक्रार असली तरी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा सूचना केल्या आहेत, तसेच वसतिगृहाचे निरीक्षण करण्यासही सांगितले आहे.
नागपुरात मेडिकलमध्ये रॅगिंगची तक्रार : विद्यार्थ्यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 12:22 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) वसतिगृह चार मधील एका विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची तक्रार केंद्रीय रॅगिंग समितीला प्राप्त झाली. याची गंभीर दखल घेत मेडिकल प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची एक-एक करून चौकशी केली.
ठळक मुद्दे निनावी तक्रार असल्याचे झाले स्पष्ट