नागपूर : निष्काळजीपणे कार चालवून अपघात करणारा आरोपी राघव परमजित शर्मा (२४) याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी भादंविच्या कलम ३०४-अ अंतर्गत तीन महिने कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस. डी. मेहता यांनी हा निर्णय दिला.
याशिवाय आरोपीला भादंविच्या कलम २७९ व ३३८ अंतर्गत प्रत्येकी एक महिना कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी दत्तवाडी येथील रहिवासी आहे. ही घटना १९ ऑगस्ट २०१६ रोजी सदर पोलिसांच्या हद्दीत घडली होती. आरोपीने निष्काळजीपणे कार चालवून झाडाला धडक दिली. त्यामुळे ललित शर्मा व त्याचे काही सहकारी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ललित शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपीला ८ सप्टेंबर २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तायडे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रजनी मेहर यांनी कामकाज पाहिले.