नागपूर : मेडिकलमध्ये इंटर्नशिप करीत असलेल्या सहा जणांनी मिळून ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याचे स्पष्ट होताच ‘ॲण्टी रॅगिंग कमिटी’ने तातडीने निर्णय घेत सहाही जणांना वसतिगृहातून बाहेर काढत त्यांची इंटर्नशिप रद्द केली. लवकरच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली जाणार आहे.
रॅगिंगच्या विरुद्ध अनेक वेळा सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठाने निर्देश दिले आहेत. देशात रॅगिंग हा मोठा गुन्हा मानला गेला आहे. मात्र आजही मेडिकलसारख्या आदर्श संस्थेत रॅगिंगचा प्रकार पुढे आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, ‘मेडिकल ॲण्टी रॅगिंग कमिटी’च्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी रॅगिंग झाल्याचा मेल धडकला. सोबत ‘व्हिडीओ’ही होता. एका समिती पदाधिकाऱ्याच्या पाहणीत हा मेल येताच त्यांनी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याकडे याची माहिती दिली. त्यांनी याला गंभीरतेने घेत समितीची बैठक बोलावली. व्हिडीओत इंटर्नशिप करणारे सहा विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग घेत त्याला झापड मारल्याचे दिसून आले. समितीने रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्याला बोलावून त्याला विश्वासात घेतले. विद्यार्थ्याने रॅगिंग झाल्याची कबूल देताच व त्याच्याकडून तक्रार नोंदवून घेतली. पुढील तीन तासात समितीने रॅगिंग घेणाऱ्या सहाही इंटर्नना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले. सोबतच मेडिकलमधील त्यांची इंटर्नशिपही रद्द केली. ‘एमबीबीएस’चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शासकीय रुग्णालयात एक वर्ष रुग्णसेवा देण्याला ‘इंटर्नशिप’ म्हटले जाते.
‘लोकमत’शी बोलताना अधिष्ठाता डॉ. राज गजभिये म्हणाले, ही एक धक्कादायक घटना आहे. परंतु तक्रारीचा मेल मिळताच त्याची शहानिशा करून पुढील तीन तासांत दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली जाईल.