नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या विरोधात अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात सभा घेऊन लोकचळवळ उभी केली जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली सभा २० ते २५ एप्रिलदरम्यान नागपुरात घेण्याची तयारी सुरू आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी हे दोन्ही नेते संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात दाखल होऊन मोदी सरकारने सुरू केलेल्या हुकूमशाहीला सडेतोड उत्तर देतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी गुजरातच्या सूरत येथील सत्र न्यायालयात राहुल गांधी गेले असता नाना पटोले यांनी सूरत येथे जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत पटोले यांनी नागपुरात जाहीर सभा घेण्याची विनंती राहुल गांधी यांना केली. यावर राहुल गांधींनी सकारात्मकता दर्शवली आहे. पटोले बुधवारी दुपारी दिल्लीहून नागपुरात दाखल झाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी, प्रियंका गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मोठी सभा नागपुरात घेण्याची आमची तयारी आहे. १० एप्रिल रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक ठाण्यात होणार आहे. तीत या सभेसंदर्भात चर्चा होईल. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी यासंदर्भात बोलणे झाले आहे. गुजरातच खोटं मॉडेल सांगून पंतप्रधान मोदी हे २०१४ मध्ये निवडणूक जिंकले. राहुल गांधी यांना चुकीच्या पद्धतीने अडकवून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि खासदारकी रद्द केली. यामुळे सामान्य जनतेमध्ये रोष पाहायला मिळत आहे. देशात संविधानिक व्यवस्थेला संपवण्याचा काम सुरू आहे, सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना दडपणे सुरू आहे, हे सगळे विषय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या सभेच्या माध्यमातून होणार आहे.
विदर्भभर बैठका, नेत्यांवर जबाबदारी
- राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या नागपुरातील प्रस्तावित सभेच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भभर दौरा करून बैठका घेणार आहेत. नेत्यांवर जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. या सभेला अडीच ते तीन लाखांवर गर्दी होईल, असा नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे एवढी मोठी गर्दी सामावून घेण्यासाठी नागपूरच्या आसपास योग्य जागेचा शोध घेतला जाणार आहे.
आशिष देशमुखांवर कारवाई होणार
- आशिष देशमुख यांनी केलेल्या आरोपांबाबत पटोले म्हणाले, नाना पटोलेला विकत घेणारा जन्माला आलेला नाही. माझे मेडिकल कॉलेज नाही. ज्यांना डोनेशन पद्धत माहीत आहे, त्यांना तसे वाक्य सूचतात. पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.