नागपूर : देशातील महामार्गांना दिशा देणाऱ्या व भारताचे हायवेमॅन म्हणूनही ओळख असणाऱ्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर चित्रपट येत आहे. या चित्रपटात गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यावरील पडदा हटला असून राहुल चोपडा हा अभिनेता गडकरी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
आपल्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन गडकरींवर येणाऱ्या चित्रपटाचं नाव 'गडकरी' असे आहे. या चित्रपटातून गडकरींचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. गडकरी यांचा संघर्ष, जनसंघापासून भाजपपर्यंतचा त्यांचा प्रवास, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे योगदान, राजकीय प्रवासातील प्रमुख टप्पे इत्यादींवर यात प्रकाश टाकण्यात येणार आहे. बॅकड्रॉपमध्ये महामार्ग, रस्ते आणि पाठमोरे नितीन गडकरी असे या चित्रपटाचे पोस्टर आहे.
हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात त्याचे पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटात गडकरी यांच्या पत्नी कांचन यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. अनुराग भुसारी यांनी गडकरींच्या या बायोपिकचं दिग्दर्शन केले आहे. तर अक्षय देशमुख यांनी निर्मिती केली आहे. याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर चित्रपट येऊन गेले आहेत.