नागपूर - विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. मात्र, विरोधकांनी पहिल्याच दिवशी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यावरुन सभागृहाबाहेर गोंधळ सुरू केला आहे. भाजपाच्या सर्वच आमदारांनी मी सावरकर नावीच टोपी परिधान करुन विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर, माफी मांगो, माफी मांगो... राहुल गांधी माफी मांगो... अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे, सावरकर यांच्यावरील विधानावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला जाणार नाही, असे सांगत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. तर नागरिकत्व कायदा हाच मुळात सावरकरांच्या विचारसरणीविरुद्ध असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी याच मुद्द्यावरुन गदारोळ घातला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, केवळ सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सावरकरांच्या अपमानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव असल्याची भूमिका घेत, सत्तारूढ महाविकास आघाडी भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.