लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटन बांधणीकडे विशेष लक्ष देत असलेले राहुल गांधी हे लवकरच नागपुरात बूथ कार्यकर्त्यांच्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून ते कॉंग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत निवडणुकीचा बिगुल फुंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी नागपुरातील संमेलनास येण्याचे मान्य केले आहे.विकास ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेत नागपूर शहर काँग्रेसतर्फे गेल्या चार वर्षात राबविलेले उपक्रम, केलेली आंदोलने याचा लेखाजोखा असलेला अहवाल सादर केला. या अहवालात प्रत्येक आंदोलनाशी व उपक्रमाशी संबंधित सचित्र माहिती देण्यात आली आहे. ठाकरे यांनी चर्चेत सांगितले की, नागपूर शहरात १९४५ बूथ असून प्रत्येक बूथवर अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक बूथवर दहा सदस्य नेमण्यात आले आहे. बूथ पदाधिकारी व सदस्यांची संख्या सुमारे २० हजार होते. नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर असून येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे आपण येथील २० हजार बूथकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात यावे, असे निमंत्रण ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले. ही विनंती राहुल गांधी यांनी तात्काळ मान्य केली व महाराट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व व संघटन महासचिव अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करून लवकरच कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन दिले, असे ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गेल्या चार वर्षात शहर काँग्रेसच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निर्भयपणे भाजपाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलने केली. अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी लढा सुरू ठेवला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. शहर काँग्रेसतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनांची राहुल गांधी यांनी प्रशंसा केली व संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाय योजण्याची सूचना केली.गहलोत यांनाही सोपविला अहवाल ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने अशोक गहलोत यांची भेट घेतली. त्यांनाही शहर काँग्रेसच्या कामाचा अहवाल सोपविण्यात आला. यावेळी विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, प्रशांत धवड, नगरसेवक संदीप सहारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालवंशी, नितीश ग्वालवंशी, दीपक वानखेडे, योगेश तिवारी, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, प्रवीण गवरे, सूरज आवळे, राज खत्री, आसिफ शेख, हर्शल पाल, प्रशांत उके, प्रवीण सांदेकर आदी उपस्थित होते.